Monday, March 1, 2021
Home Maharashtra News नकटीच्या लग्नात सतराशे साठ विघ्न, तशी गत कांजुरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेची

नकटीच्या लग्नात सतराशे साठ विघ्न, तशी गत कांजुरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेची

सध्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असल्यानं अधिकारी त्यात व्यस्त आहेत. यंदाचं हे अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ दोनच दिवसांचं असल्यानं बुधवारी यावर राज्य सरकारच्यावतीनं उत्तर दिले जाईल. तेव्हा हायकोर्टानं यावर बुधवारी सकाळी १०.३० वाजता सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. १०२ एकरचा हा भूखंड एमएमआरडीएला मेट्रो कारशेडसाठी देताना जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशात त्रुटी असल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी आपला यासंदर्भातला निर्णय मागे घेत याप्रकरणाची नव्याने सुनावणी घ्यावी. अन्यथा आम्ही त्या आदेशा बाबतच्या कायदेशीर बाबी पडताळून त्याची वैधता ठरवू असे स्पष्ट संकेत सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत.

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेन वरील ताण कमी करण्यासाठी मेट्रोचा प्रकल्प हा़ अत्यंत गरजेचा आहे. शहराच्या विविध भागात मेट्रोचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून कारशेड शिवाय मेट्रो चालवता येणार नाही. कांजूरमार्ग कारशेडची जागा नेमकी कोणाच्या मालकीची हे अद्याप ठरणं बाकी असून लोकांचे हित लक्षात घेता कोर्टाने मेट्रोच्या कामाला स्थगिती देऊ नये असा युक्तिवाद एमएमआरडीएतर्फे ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी केला. तसेच मेट्रो ३ मध्ये केंद्र सरकारचे निम्मे शेअर्स असल्याचेही त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून देत ऑक्टोबर २०२२ पर्यंत मेट्रोच्या कामाची डेडलाईन असल्याचेही कोर्टात सांगितले.

आरेतील मेट्रो ३ च कारशेड कांजूरमार्ग इथं हलवण्याचा निर्णय होताच केंद्र सरकारनेही कांजूरमार्गच्या या जागेवर स्वतःचा मालकी हक्क दाखवला होता. सदर जागा ही मिठागराची असल्यामुळे त्यावर केंद्राचा अधिकार आहे असं नमूद करून त्यावर कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा बोर्ड लावला होता. दरम्यान एका बांधकाम व्यवसायिकानंही ती जागा आपण मिठागराकडून भाडे तत्त्वावर काही वर्षांपूर्वी घेतलेली आहे. तसा आमच्यात करार झाला असून सध्या एमएमआरडीएनं तिथं मेट्रो कारशेडसाठी जे खोदकाम सुरू केलं आहे ते तात्काळ थांबवावं असा उल्लेख असणारी नोटिसच महेशकुमार गरोडीया यांनी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरिकर यांना पाठवली आहे. गरोडीया ग्रुपचं म्हणणं आहे की,  त्यांनी कांजूर गावात सुमारे ५०० एकर जमीन भाडयाने घेतली आहे. त्यामध्ये मेट्रो कारशेडसाठी घेतलेल्या जमीनीचाही समावेश आहे. त्यामुळे मिलिंद बोरिकर यांनी जी १०२ एकर जमीन एमएमआरडीएला देणारे आदेशपत्र दिले आहे ते तात्काळ रद्द करावे. यासांदर्भात गरोडिया यांनी केंद्र सरकारनं त्यांचा करार रद्द करण्याच्या निर्णयाला साल २००५ मध्ये हायकोर्टात आव्हान दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments