Thursday, February 25, 2021
Home Maharashtra News मुंबई सेंट्रल टर्मिनसचं होणार बारस

मुंबई सेंट्रल टर्मिनसचं होणार बारस

मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलण्याची मागणी शिवसेनेकडून सातत्यानं करण्यात येत होती. आता मुंबईच्या आणि शिवसेनेच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये मुंबई सेंट्रल टर्मिनस या रेल्वे स्थानकाचं नाव बदललं जाणार असल्याची बाब स्पष्ट होत आहे. शहरांच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन जोरदार राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय उपराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेनेचे उपनेते अरविंद सावंत यांना एका पत्राद्वारे यासंदर्भातील माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वीच आताच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मांडला होता’, असं म्हणत त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. अमित शाह यांना लिहिलेल्या पत्राचं उत्तर नुकतंच मिळालं. ज्यामध्ये नामांतराची प्रक्रिया सुरु झाली असून, हे बदल लवकरच कार्यरत होणार असल्याचं नमुद केल्याचं सावंत यांनी स्पष्ट केलं.

नाना शंकर शेठ यांना भारतीय रेल्वेचे जनक मानले जाते. त्याचप्रमाणे आधुनिक मुंबईचे शिल्पकार देखील म्हणून ते ओळखले जातात. त्यांचे मूळ नाव जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे असे होते. लोक त्यांना आदराने नाना म्हणत. त्यांचा जन्म १८०३ साली तर मृत्यू १८६५ साली मुंबईत झाला. ते एक व्यवसायिक होते. त्याचसोबत शिक्षण तज्ञ, समाजसुधारक देखील होते. भारतात आणि पर्यायाने आशियात रेल्वे सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ते इंडियन रेल्वे असोसिएशनचे सदस्य होते. याच संस्थेमुळे इंग्रजांनी मुंबईत रेल्वे सुरू केली. भारतातील पहिल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे म्हणजेच आताच्या मध्य रेल्वेच्या संचालकांपैकी एक होते. पहिल्या बोरी बंदर ते ठाणे धावलेल्या रेल्वेमध्ये त्यांनी गोल्डन पासने प्रवास केला होता. त्यावेळी रेल्वेत प्रवास करायला नागरिक घाबरायचे मात्र नाना यांनी स्वतः प्रवास करून लोकांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.

CST at night

मुंबईतील अनेक स्टेशनच्या उभारणीसाठी त्यांनी स्वतःची जमीन दान केली तसेच भरगोस निधी दिला. तसेच रेल्वे टिकीट घरासाठी त्यांनी आपल्या बंगल्यातील मागील बाजूची जागा देऊन टाकली. त्यांचा वाडा गिरगावात होता. त्यामुळेच पश्चिम रेल्वेवरील सर्वात महत्त्वाच्या स्टेशनचे म्हणजेच मुंबई सेंट्रल चे नाव बदलून नाना शंकरशेठ ठेवण्यात यावे अशी शिवसेनेची मागणी होती. आधुनिक मुंबईच्या उभारणीसाठी नानाचे अवर्णनीय योगदान आहे.

काही वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेवरील एलफिस्टन रोड या स्टेशनचे नाव बदलण्यात आले होते. खासदार राहुल शेवाळे यांनी मागणी केल्याने एलफिस्टन रोडचे नाव बदलून त्या ठिकाणी प्रभादेवी असे ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेवरील आधीच्या विक्टोरिया टर्मिनल्सचे नाव बदलून १९९६ साली छत्रपती शिवाजी टर्मिनस असे ठेवण्यात आले. त्यानंतर २०१७ साली हे नाव देखील बदलून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे ठेवण्यात आले. इतकेच काय तर मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव देखील आधी बॉम्बे सेंट्रल असे होते. १९३० सालापासून ते १९९७ पर्यंत बॉम्बे सेंट्रल असेच नाव होते. १९९७ साली ते बदलून मुंबई सेंट्रल असे ठेवण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments