Thursday, February 25, 2021
Home Entertainment संगीतकार नरेंद्र भिडेंची अचानक एक्झिट

संगीतकार नरेंद्र भिडेंची अचानक एक्झिट

सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे गुरुवारी पहाटे, हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कर्वे नगर येथील डॉन स्टुडिओ येथे सकाळी साडेनऊ वाजता ठेवण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. भिडे यांच्या पाश्चात त्यांची आई ,वडील, पत्नी आणि दोन मुले असा मोठा परिवार आहे. सिव्हिल इंजिनीयरची पदवी घेतलेल्या नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटके, मालिका, मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद महंमद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे तर पाश्चिमात्य संगीताचे शिक्षण हेमंत गोडबोले यांच्याकडून घेतले. त्यांनी अनेक नाटक,  मालिका, चित्रपट आणि  जिंगल्सच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांना पाच वेळा झी गौरव, सह्याद्री सिने अवॉर्ड, दोन वेळा राज्य नाट्य पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार, श्रीकांत ठाकरे पुरस्कार, म.टा.सन्मान, राज्य चित्रपट पुरस्कार आदि विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नरेंद्र भिडे यांनी बर्याच प्रसिद्ध चित्रपटांना संगीत दिले आणि त्यांना त्यामध्ये अफाट यश सुद्धा मिळाले. मुळशी पॅटर्न, रानभूल, त्या रात्री पाऊस होता, हिप हिप हुरे, पाऊलवाट, अनुमती , दिल ए नादान,  देऊळ बंद,  कलम ३०२, साने गुरुजी, शासन सिंहासन, चौधवी का चाँद, आंधळी कोशिंबीर, आघात, शेवरी, रमा माधव, एलिझाबेथ एकादशी, यशवंतराव चव्हाण, हरिशचंद्राची फॅक्टरी, मालक, मसाला, समुद्र, चाँद फिर निकला याशिवाय श्वास, सरीवर सरी, माती माय सह अनेक चित्रपटांना पार्श्वसंगीत दिले. तसेच नाटकांमध्ये कोण म्हणत टक्का दिला?, माकडाच्या हाती शॅम्पेन, काटकोन त्रिकोण, चिरंजीव आईस, चांदणे शिंपीत जा, हमीदाबाईची कोठी, जोडी तुझी माझी, एक झुंज वाऱ्याशी, गोडी गुलाबी, फायनल ड्राफ्ट, लव्ह बर्डस , व्हाईट लिली अँड नाईट रायडर, अलीबाबा आणि ४० चोर, छापा काटा, आषाढातील एक दिवस,  संगीत गर्वनिर्वाण इत्यादी अनेक नाटके संगीतबद्ध केली.

त्याचप्रमाणे टिव्ही मालिकांसाठी सुद्धा त्यांनी संगीत दिले आहे. यामध्ये अवांतिका, ऊन पाऊस, साळसुद, घरकुल, मानो या ना मानो, पळसाला पाने पाच, भूमिका, पेशवाई, नूपुर, अबोली, श्रावण सरी, सूर- ताल, कॉमेडी. कॉम, फुकट घेतला शाम, अमर प्रेम इत्यादींचा समावेश आहे. चित्रपट सृष्टीतील बर्याच जणांनी सोशल मिडिया वरून एक हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्या आड गेला या आशयाची त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments