Monday, March 1, 2021
Home Maharashtra News यवतमाळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेली घटना भयंकर

यवतमाळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेली घटना भयंकर

 ३१ जानेवारीपासून देशात राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय पोलिओ लसीकरण दिनी ३० जानेवारीला राष्ट्रपती भवनात काही मुलांना पोलिओ थेंब देऊन या मोहिमेची सुरूवात केली. या मोहिमेअंतर्गत ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना पोलिओ थेंब देण्यात येणार असून ही मोहीम २ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पोलिओ निर्मुलनाच्या पुढाकारानंतर १९९५ मध्ये पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम सुरू झाला. पोलिओ लसीकरण मोहीम ज्या रविवारी सुरु झाली त्याला राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून ओळखले जाते.

यवतमाळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरणा दरम्यान लहान मुलांना सॅनिटायझर  पाजल्याचा धक्कायदायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, मुलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. ही सर्व मुले १ ते ५ वयोगटातील आहेत. या घटनेनंतर पालकवर्गांमध्ये चिंताजनक वातावरण पाहायला मिळत आहे. यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणादरम्यान १२ मुलांना सॅनिटायजर पाजण्यात आले. सुरुवातीला मुलांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुलांना उलट्या होण्याचे कारण तपासले असता पोलिओ लसीकरणा दरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आल्याची माहिती समोर आली. हा संपूर्ण प्रकार गंभीर असून याची चौकशी केली जात आहे. मुलांना लस म्हणून सॅनिटीझर पाजण्यात आले हे लक्षात आल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत काही सांगितले नाही. संपूर्ण प्रकार गंभीर असून यात कोणाकडून ही चूक झाली याची चौकशी करुन कारवाईचा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिला होता.

 या घडलेल्या प्रकारानंतर पालकवर्गांकडून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. तसेच लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. दरम्यान, यवतमाळ जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी रात्री रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. या प्रकरणी आता चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी भूषण मसराम, वैद्यकीय अधिकारी महेश मनवर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.  तर समुदाय आरोग्य अधिकारी अमोल गावंडे आणि आशा वर्कर संगीता मसराम यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments