डॉ. शीतल आमटे या डॉ. विकास व डॉ. भारती आमटे यांची मुलगी आहेत. काही दिवसांपूर्वी डॉ. शीतल आमटे यांनी सोशल मीडियावर लाइव्ह व्हिडीओ शेअर करुन महारोगी सेवा समितीच्या कार्यकर्त्यांवर, विश्वस्तांवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ माजली होती. परंतु दबावामुळे त्यांनी एक दोन तासात हा व्हिडीओ सोशल मिडिया वरून डिलीट केला. मात्र यानंतर डॉ. विकास आमटे, प्रकाश आमटे, मंदा आमटे आणि भारती आमटे यांनी पत्रक काढून त्यांचे आरोप फेटाळून लावले होते. त्यांची मानसिक स्थिती फारशी ठीक नसून त्यांच्यावर मानसिक उपचार सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर डॉ. शीतल आमटे-करजगी यांचे आई वडील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन चालविणारे डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे यांनी तसंच गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसामध्ये आदिवासींसाठी काम करणारे डॉ. प्रकाश – डॉ. मंदाकिनी आमटे यांनीही सह्या केल्या होत्या.
डॉ. शीतल आमटे या ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय. बाबा आमटे यांच्या नात होत्या. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी व्हिडीओ ब्लॉग बनवले होते. घरातील इतर सदस्यांनी सांगितलेल्या त्यांच्या मानसिक स्थिती बद्दल ऐकता डिप्रेशनमधून बाहेर कसे पडावे यावरही त्यांनी व्हिडीओ बनवला होता. त्यामुळे आज आलेल्या त्यांच्या आत्महत्येचं वृत्त अतिशय धक्कादायक आहे.
मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत वाद निर्माण झाले होते. हे वादानी अनेकदा मोठे स्वरूपही घेतले होते. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. या प्रकरणाबाबत त्यांनी खुलासा केला होता. “दिवंगत बाबा आमटे यांच्या कार्याला मी आणि माझे पती गौतम करजगी पुढे नेत आहोत. आम्ही एक निवेदन जारी करून आमची भूमिका लवकरच स्पष्ट करू. मी फेसबुक लाईव्ह करून माझी मतं मांडली होती परंतु तो व्हीडिओ मला डिलिट करण्यास भाग पाडलं गेलं,” अशी प्रतिक्रिया डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी दिली.
नातेसंबंध आणि महारोगी सेवा समितीमधील कलहाचा त्रास सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असंही सांगितलं जात आहे. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.