महापालिकेने शहराचे ब्रँडिंग करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत ‘लव्ह औरंगाबाद’ मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. शहराचे ब्रँडिंग होऊन नागरिक व पर्यटकांना या शहराची माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे. औरंगाबादचे मूळ नाव खडकी असे होते, नंतर ते औरंगाबाद झाले. जिल्ह्यातील पैठण या शहराचे ऐतिहासिक नाव प्रतिष्ठान नगरी, असे आहे. प्रशासनाने सिडको एन १ पोलिस चौकीच्या शेजारील पिरॅमिड जवळ ‘लव्ह औरंगाबाद’ चा डिस्प्ले लावला गेला आहे. त्याच बरोबर हायकोर्टाच्या जवळ ‘लव्ह प्रतिष्ठान’, तर खडकेश्वर महादेव मंदिर परिसरात ‘लव्ह खडकी’ असा डिस्प्ले लावला आहे. हे सर्व पॉइंट सेल्फी पॉइंट म्हणून ओळखले जात आहेत.
अंबादास दानवे, आमदार, जिल्हाप्रमुख शिवसेना यांनी सांगितले कि, मातृभूमी प्रतिष्ठानचा मी अध्यक्ष आहे. त्या नात्याने ‘सुपर संभाजीनगर’ असे दहा ठिकाणी डिस्प्ले लावण्यासाठी मी पालिका प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. त्यापैकी क्रांती चौक आणि टीव्ही सेंटर चौक या दोन ठिकाणची परवानगी मिळाली आहे.
तर मुश्ताक अहेमद (‘संभाजीनगर’ नावाबद्दलचे याचिकाकर्ते) यांनी या शहराचे कायदेशीर नाव औरंगाबाद असेच आहे आणि तेच नाव सर्वांना घ्यावे लागेल. हे नाव बदलता येणार नाही. एखादी संस्था, जर ‘संभाजीनगर’ नावाने काही करीत असेल, तर तो त्या संस्थेचा अंतर्गत विषय आहे. पण मुख्यमंत्र्यांना किंवा शासनाचे प्रतिनिधी असलेल्या कोणालाही ‘संभाजीनगर’, असा उल्लेख करता येणार नाही.
शिवसेनेकडून औरंगाबादचा कायमच संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याच्या वेळीही सीएमओच्या ट्वीटमध्ये संभाजीनगर असा उल्लेख केला होता. आता औरंगाबादमध्ये ‘सुपर संभाजीनगर’ असा फलक दिसू लागला आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादला ‘सुपर औरंगाबाद’ करण्याची घोषणा केली. पालकमंत्र्यांच्या भाषणातील हाच धागा पकडून मातृभूमी प्रतिष्ठानने टीव्ही सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या जवळ ‘सुपर संभाजीनगर’ असा डिस्प्ले लावला आहे. दुसरा डिस्प्ले क्रांती चौकात लावला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेसह विकास कामांचे भूमिपूजन झाल्यानंतर महापालिका निवडणुकीची चर्चा अधिक गांभीर्याने सुरू झाली आहे. ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे ब्रँडिंग करण्यासाठी महापालिकेने ‘स्मार्ट सिटी योजने’तून शहरात ‘लव्ह औरंगाबाद’ चे डिस्प्ले बोर्ड लाऊन सेल्फी पॉइंट तयार केले आहेत. त्यातच ‘सुपर संभाजीनगर’ या नावाचे डिस्प्ले लागल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. ‘लव्ह औरंगाबाद’च्या तुलनेत ‘सुपर संभाजीनगर’ विषय ट्रेंड मध्ये आहे.