राज्यात जवळपास १४ हजार ग्रामपंचायतींसाठी निवडणूका पार पडत आहेत. १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका महिनाभरापूर्वी जाहीर झाल्या. अद्याप कोरोनाचे सावट गेले नसले तरी ग्रामीण भागातील राजकीय पदाधिकारी जोशाने पक्षाच्या कामाला लागले होते. कोरोनाच्या काळात ग्रामीण भागात तरुणाई आणि ज्येष्ठांमध्ये चांगला समन्वय निर्माण झाला आहे. गेल्या सहा ते सात महिन्यात अनेक समस्यांवर तोडगा निघाला आहे. त्यामुळे निवडणुका जाहीर झाल्यावर तरुणाईचा कल ग्रामपंचायतीची काम करण्यासाठी जास्तच वाढला आहे. अगदी ज्येष्ठांनीही तरुणांना अमूल्य मार्गदर्शन करत सहकार्य केले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात जवळपास ६७ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. बार्शी तालुक्यातील धोत्रे गावात देखील यंदा ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडणून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी ग्रामस्थांनी अनोखा निर्णय घेतलाय. गावातील माजी सैनिक आणि महिला राखीव जागांवर माजी सैनिकांच्या पत्नींना संधी देण्यात आली आहे.
ग्रामपंचायत निवडणुका म्हटलं की गटबाजी, पक्षीय राजकारण आलेच, त्यामुळे गावात कधीच निवडणुक बिनविरोध झाली नाव्हती. परंतु, काही ठिकाणी अपवाद पाहता येतात. यावर्षी मात्र देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचा सन्मान करण्याचे हेतून गावकऱ्यांनी आदर्श निर्णय घेतला. सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या या सैनिकांचा अनोखा सन्मान करुन धोत्रे ग्रामस्थांनी समाजासमोर एक प्रकारचा अनोखा आदर्शचं ठेवला आहे.
बार्शी शहरापासून जवळपास १२ किलोमीटर अंतरावर वसलेल्या धोत्रेत जवळपास २ हजार लोक राहतात. मात्र गावाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर छोट्याशा गावात तब्बल ३३ माजी सैनिक आणि ३५ आजी सैनिक आहेत. १९५६ साली स्थापन झालेल्या या गावात आतापर्यंत केवळ पक्षीय राजकारण चालायचं. धोत्रे गावात ३ प्रभागासाठी ९ ग्रामपंचायत सदस्य आहेत. ९ सदस्यांसाठी एकूण १७ सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र गावाने घेतलेला कौतुकास्पद निर्णय पाहता उर्वरित ८ सदस्यांनी आपले अर्ज आपसूकच पाठी घेतले. माजी सैनिकांप्रती आदर व्यक्त करत अर्ज माघारी घेणाऱ्या उमेदवारांचा देखील ग्रामस्थांनी सन्मान केला. दरम्यान गावकऱ्यांनी दाखवलेल्या या विश्वासास कोणत्याही पद्धतीने तडा जाऊ देणार नाही.
देशाच्या सीमेवर आपल्या सर्वांचं रक्षण सैनिक करत असतात. सैन्यात सेवा बजावून आपल्या घरी परतलेल्या याच माजी सैनिकांचा अनोखा सन्मान बार्शीकरांनी केला आहे. गावातील ग्रामपंचायतीचा सर्व कारभार माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या पत्नी ह्यांच्या हाती सोपवण्यात आला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण धोत्रे गावाने एकमताने आणि बिनविरोधपणे हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या या अनोख्या निर्णयाची चर्चा सर्वत्र होत आहे.