लॉकडाउनच्या काळात बंद असेलली मंदिर् पुन्हा एकदा खुली करण्यात आली असून ठिकठिकाणी दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्या आहेत. शिर्डीमधील साईबाबा मंदिरही दर्शनासाठी खुले करण्यात आले असून भक्तानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भक्त श्रद्धेने देश-विदेशातून येत असतात. त्यात वेगवेगळ्या जाती-धर्माच्या साईभक्तांचा समावेश असतो. अशावेळी भक्ताने सभ्य पोषाख घालून यावे, अशा पद्धतीचा बोर्ड लावून बंधनं घालणं योग्य ठरणार नाही, असे भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी नमूद केले.
भारतात लोकशाही असून त्याने प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळेच कोणी काय बोलावे, कुठे कसे कपडे घालावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मंदिरात कशा पद्धतीचे कपडे घातले पाहिजेत, याचे भान भक्तांना आहे. भक्तांचे श्रद्धास्थान हे कुठल्या कपड्यांवरून आपण ठरवू शकत नाही. श्रद्धा महत्त्वाची असते. मंदिरांमधील पुजारी हे अर्धनग्न अवस्थेत असतात. ते फक्त सोवळे नेसतात, त्यावर कधी कोणत्या भक्ताने आक्षेप घेतला नाही वा अर्धनग्न पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असा बोर्डही लावला नाही”, असेही तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचा बोर्ड लावणे हा संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा अपमान आहे, असा आरोपही देसाई यांनी केला.
शिर्डी साईबाबा मंदिरात कोरोना महामारीच्या दरम्यान विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. ऑनलाईन पद्धतीने दर्शनासाठी पास घ्यावा लागणार आहे. ठरवून देण्यात आलेली वेळ आणि तारखेनुसार भाविकांना दर्शन दिलं जाणार आहे. ३००० भाविकांना ऑनलाईन पेड पास दिला जाणार आहे. इतर वेळी आरतीसाठी २५० ते ३०० भाविक उपस्थित असतात मात्र यावेळी आरतीसाठी ५० जणांनाच सहभागी होता येणार आहे. एकीकडे संस्थानच्या या निर्णयाचा ज्या साई भक्तांवर याचा परिणाम होणार आहे, त्यांनी मात्र आपल्या प्रतिक्रिया देताना काहींनी स्वागत केलं आहे. तर काहींनी हा निर्णय चुकीचा वाटतो. मात्र अशा आवाहनामुळे राजकारण करु नये अशीही भावना भक्तांनी बोलून दाखवली आहे. तर एकीकडे फलकावरून वाद सुरु असताना अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी साई दर्शन घेतले असून हा निर्णय सक्तीचा नसून आवाहन असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी भक्तांनी या आवाहनाला प्रतिसाद देण्याचं आवाहन करत एक प्रकारे समर्थनचं केलं आहे. याबाबत साई संस्थानच्या वतीनं पहिल्या दिवसापासून ही सक्ती नसून आवाहन असल्याचं सांगितलं असून भाविकांनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर असे आवाहनचे फलक लावले असल्याचं स्प्ष्ट केलं आहे.
भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी १० डिसेंबरला शिर्डीत येऊन फलक काढण्याचा इशारा दिल्यानंतर आता शिर्डीत ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून भविष्यात तृप्ती देसाई यांनी असं काही केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे