अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हे सर्वपरिचित नाव आहे. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या उर्मिला मातोंडकर यांची ओळख सिनेसृष्टीसह अखिल भारताला कळली ती उर्मिला यांनी बालकलाकार म्हणून काम केलेल्या मासूम या चित्रपटाद्वारे. उर्मिला मातोंडकर यांचे वडील श्रीकांत मातोंडकर यांचा अनेक सामाजिक चळवळींमध्ये सक्रीय सहभाग होता. ते कामगार नेतेसुद्धा होते आणि ते राष्ट्र सेवा दलाशी संबंधित होते. त्यामुळे माझ्यावर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार आहेत, असं उर्मिला मातोंडकर यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितलं आहे. हिंदी इंडस्ट्रीत नायिका म्हणून त्यांनी नरसिंहा, रंगीला, सत्या, कौन, जंगल, मस्ती, जुदाई, प्यार तुने क्या किया अशा चित्रपटांतून विविध भूमिका साकारून उर्मिला यांनी एक यशस्वी अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनयातील कौशल्याबद्दल त्यांना फिल्म फेअरसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
२०१९ मधील काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी निवडणूक लढवली होती. यात भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता. परंतु पराभूत होऊनही त्यांना मिळालेली मतं पाहता आपल्या विचारी संवाद कौशल्यातून त्यांनी प्रचारासाठी कमी कालावधी मिळूनसुद्धा चांगली लढत दिली होती. या निवडणुकीनंतर पक्षांतर्गत चाललेल्या राजकारणाला कंटाळून त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हातावर शिवबंधन बांधलं. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, खासदार प्रियांका चतुर्वेदी देखील उपस्थित होत्या. त्यानंतर दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत उर्मिला मातोंडकर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. आता शिवसेना उर्मिला मातोंडकर यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवणार याची उत्सुकता आहे. महत्त्वाचं म्हणजे विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांमध्ये शिवसेनेने आपल्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना आधीच उमेदवारी दिली आहे. पक्षप्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मीनताई ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून असे म्हणाल्या “फार असं वाटतंय की असायला पाहिजे होते हे, एकच गोष्ट खरोखरच मिस करतेय,” त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना नोएडामध्ये उभारत असलेल्या फिल्मसिटीसाठी शुभेच्छा देत मुंबई बॉलीवूडच्या रक्तात आहे, नसा-नसा भिनलेली आहे, त्यामुळे मुंबई आणि बॉलीवूड कधीही वेगळं होणार नाही असे म्हटले आहे.
२०१६ सालामध्ये उर्मिला आपल्या वैवाहिक जीवनात व्यग्र झाल्या. पण २०२० मध्ये त्या पुन्हा चर्चेत आल्या त्याला कारणही तसेच होते, उर्मिला यांनी अलिकडच्या काळात कंगना राणावतवरही आपल्या विचारी आणि अभ्यासू वृत्तीने प्रत्युत्तर दिले. अशावेळी उर्मिला मातोंडकर या मोजक्या अशी अभिनेत्रींपैकी एक होत्या, ज्यांनी कंगना राणावतला प्रत्युत्तर दिलं. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शिवसेनेलाही याचा फायदा झाला. त्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. आता त्यांनी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.