सायना नेहवाल थायलँड ओपन सुपर १००० टुर्नामेंटमध्ये सहभागी होणार आहे. ही स्पर्धा १२ ते १७ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. परंतु, आता कोरोनाची लागण झाल्यामुळे सायनाच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मॅचआधी सराव करत असताना आयोजकांनी मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मला बँकॉकमधल्या हॉस्पिटलमध्ये रवाना होण्यास सांगितलं. नियमांनुसार चाचणीसाठी स्वॅब दिल्यानंतर पाच तासात अहवाल मिळणं अपेक्षित आहे, असं सायनाने म्हटलं आहे. मला माझ्या कोव्हिड चाचणीचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. काल कोव्हिडची तिसरी चाचणी घेण्यात आली होती. आयोजकांच्या मते सायनाला कोरोना संसर्ग झाला आहे, मात्र तसा अहवाल सायनाला मिळालेलाच नाही अशी विचित्र परिस्थिती आहे.
त्यानंतर सायना आणि प्रणॉ़य यांना कोरोना झाला आहे असंही संघटनेने स्पष्ट केलं आहे. बॅडमिंटनपटू कश्यप हा सायनाचा नवरा आहे. सायना कोरोनाग्रस्त झाल्याने कश्यपनेही स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. सायना आणि प्रणॉय यांना दहा दिवसांच्या क्वारंटीनमध्ये राहावं लागेल. तिथे त्यांना नेण्यात आलं आहे, असं संघटनेने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. कश्यप हॉटेल रुममध्ये क्वारंटीन आहे, असं संघटनेचे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी सांगितलं. दरम्यान सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप आणि एच. एस. प्रणॉय यांनी थायलंड ओपन स्पर्धेतून माघार घेतल्याचं भारतीय बॅडमिंटन संघटनेनं म्हटलं आहे.
भारताचे तन्वी लाड, अनिरुद्ध मयेकर, मिथुन मंजूनाथ, कार्तिकेय गुलशन कुमार, साईप्रणीत, किदंबी श्रीकांत, लक्ष्य सेन, सौरभ वर्मा, समीर वर्मा, शुभंकर डे, अजय जयराम, सिरील वर्मा, चिराग सेन, राहुल यादव तसंच पी. व्ही. सिंधू, साई उतेजिता राव, रुथविका शिवानी गड्डे, सात्विकसाईराज रणीकरेड्डी, मनू अत्री, एम. आर. अर्जुन, चिराग शेट्टी, सुमीत रेड्डी, ध्रुव कपिला, अश्विनी पोनप्पा, सिक्की रेड्डी हे स्पर्धेत सहभागी झाले आहेत. २०२० मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार होती. मात्र कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. २०२१ म्हणजे या वर्षी ही स्पर्धा होणार आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीने थायलंड ओपन ही भारतीय खेळाडूंसाठी महत्त्वाची स्पर्धा आहे.
सायनाने २०१२ ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं होतं. यंदा होणाऱ्या ऑलिम्पिकमध्येही सायनाचा दमदार खेळ पाहायला मिळेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. सायनाने थायलंडमध्ये पोहोचल्यानंतर ट्वीटच्या माध्यमातून काही मुद्दे मांडले होते. दिवसातून एकच तास सरावासाठी देण्यात आला आहे. जिमसाठीची वेळही तीच आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी ही महत्त्वाची स्पर्धा आहे. मात्र कोरोना नंतरच्या पहिल्याच स्पर्धेत कोरोना संसर्गावरून संदिग्धता पाहायला मिळत आहे.