आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रेक डान्सचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तरुण दर्शकांना आकर्षित करून घेण्यासाठी आयओसीने हा निर्णय घेतला आहे. बी-बॉइंग आणि हिपहॉप नावाने ओळखला जाणारा ब्रेक डान्सही आता ऑलिम्पिक खेळ, इतकेच नाही तर ब्रेकडान्स व्यतिरिक्त स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लाइंबिंग आणि सर्फिंग असे खेळही समाविष्ट करण्यात आले आहे. या खेळांचा समावेश करण्याचा प्रस्ताव पॅरिस २०२४ आयोजन समितीने दिला होता. ब्रेकडान्स सोडून इतर तीन खेळांचा समावेश टोकियो ऑलिम्पिक मध्ये होणार होता, जो कोरोना विषाणूच्या साथीमुळे एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आला होता.
२०१८ मध्ये अर्जेटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स येथे आयोजित युवा ऑलिम्पिक स्पर्धेत ब्रेक-डान्सला खूप पसंती मिळाली होती. युवा ऑलिम्पिकमध्ये यशस्वी झाल्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक आयोजकांनी, आयओसीसमोर हा खेळ समाविष्ट करण्याची शिफारस केली होती. स्ट्रीट डान्स मोठ्या शहरांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. पुढील वर्षीच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्केट-बोर्डिंग, स्पोर्ट क्लाइंबिंग आणि सर्फिंग दिसणार आहे व २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये ब्रेक-डान्सचा समावेश असेल. ब्रेक-डान्सिंग इव्हेंटला ‘ब्रेकिंग’ म्हणून ओळखले जाईल. ब्रेकिंग हा क्रीडा प्रकार कसा होवू शकतो असे विचारणारांना वर्ल्ड डान्स स्पोर्ट फेडरेशनचे ज्येष्ठ सल्लागार जीन लोरेंट बुरकीन म्हणतात की, ब्रेकिंगच्या कोणत्याही सादरीकरणात खेळाचा अंश असतोच. त्यात हात आणि पायाचा कौशल्यपूर्ण वापर करुन सादरीकरण केलेले असते, लवचिकता व चपळता असते आणि याला उत्तम समन्वय, ताकद लागतो. त्यामुळे ब्रेकडान्सिंग हा कला व क्रीडा असा संगम असतो. इतर खेळाडूंप्रमाणेच बी डान्सर्सना निरोगी जीवनशैली, योग्य आहार, व्यायाम आणि तासानतास सराव करावा लागतो. ब्रेकिंगं हे जिम्नॅस्टिक्स व फिगर स्केटिंगपेक्षा वेगळे असते. यात विशिष्ट मुव्हमेंटसाठी ठराविक गूण नसतात तर दौन स्पर्धकांदरम्यान तुलना केली जाते. त्यात तंत्र, सादरीकरण आणि शारीरिक मनमोकळे सादरीकरण याच्याआधारे निर्णय होतो, त्यात शरीर, मन आणि विचारांचे संतुलन बघितले जाते आणि त्याआधारे विजेता ठरविला जातो असे बोरकीन सांगतात.
भारतातही ब्रेक डान्सिंग बघायला मिळते. मात्र, एक क्रीडा प्रकार म्हणून आतापर्यंत कोणत्याही संस्थेची स्थापना झालेली नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबईत झालेल्या जगातील सर्वात प्रतिष्ठित ‘रेड बुल बीसी वन’ ब्रेक डान्स स्पर्धेत भारताची जोहाना रॉड्रिग्ज अंतिम फेरीत दाखल झाली होती. त्यांनी ३० देशांतील ७० नर्तकांना टक्कर दिली होती.