Friday, February 26, 2021
Home Sports News Cricket भारतीय संघाची धुरा अजिंक्यच्या खांद्यावर

भारतीय संघाची धुरा अजिंक्यच्या खांद्यावर

विराट लवकरच बाबा बनणार असून तो पालकत्व रजा घेऊन भारतात माघारी परतणार आहे. त्याच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणेवर संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माची प्रसुती जानेवारी महिन्यात होणार आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावे यासाठी तो भारतात परत येत आहे. याआधीच त्याने बीसीसीआयकडून पालकत्व रजा घेतली आहे. खरंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतर भारतीय संघाला विराटची आवश्यकता होती. पण तो सध्या पालकत्व रजेवर असल्याने उर्वरित सामन्यात अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचं नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. यापैकी अॅडलेडमध्ये खेळवलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाहून भारताच्या दिशेने रवाना झाला आहे.

पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर आता भारतीय संघ मेलबर्नमध्ये २६ डिसेंबरला बॉक्सिंग डेला दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अॅडलेडमधील डे-नाईट कसोटीच्या पहिल्या डावात ७४ धावा केल्या होत्या. परंतु भारतीय खेळाडूंना दुसऱ्या डावात फारशी कमाल दाखवता आली नाही आणि संपूर्ण संघ अवघ्या ३६ धावांवर आउट झाला. यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाचा पराभवाचा सामना करावा लागला. आता मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत. ऑस्ट्रेलियातून मायदेशी परतण्यापूर्वी त्याने संघातील सहकाऱ्यांसह बैठक घेतली. यावेळी मालिकेतील उर्वरित सामान्यात चांगली कामगिरी करण्यासाठी त्याने खेळाडूंचं मनोधैर्य वाढवले. मागील सामना विसरुन पुढील सामन्यांवर लक्ष केंद्रित करा आणि स्वत:वर विश्वास ठेवा अशा शब्दात कोहलीने खेळाडूंना उर्वरित सामन्यांसाठी प्रेरित केले. आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांसह मैदानात उतरुन उत्तम कामगिरी करा,  असे विराट आपल्या सहकार्यांना म्हणाला.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाची ही कठीण परीक्षा असेल. मात्र यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने अजिंक्य रहाणेचे कौतुक केले आहे. अजिंक्य रहाणे मैदानावर कायमच संयमी आणि शांत असल्याचे दिसून येते. रहाणे आपल्या भावनांचं प्रदर्शन मैदानावर करत नाही. अजिंक्यमध्ये पुरेपूर आत्मविश्वास आहे. आखलेल्या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याची कला त्याच्याकडे आहे. तो मैदानावर शांत दिसत असला तरी मैदानाबाहेर तो हास्यविनोदात नेहमीच सामील असतो. पण त्याच्या शांत स्वभावामुळे मैदानात दबावाची परिस्थिती असली तरी संघ समतोल पद्धतीने ते हाताळू शकतो.” रहाणे गोलंदाजांना प्राधान्य देणारा कर्णधार असल्याचे सांगत इशांतने त्याच्या नेतृत्व कौशल्याची स्तुती केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments