भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं डबल सेंच्युरी झळकावली आहे. रुटची ही शंभरावी टेस्ट आहे. शंभराव्या टेस्टमध्ये डबल सेंच्युरी करणारा तो क्रिकेट विश्वातील पहिला बॅट्समन बनला आहे. १८७७ साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मेलबर्नमध्ये पहिली टेस्ट मॅच खेळवली गेली होती. तेव्हापासून आतापर्यंत एकाही खेळाडूला असा विक्रम करता आला नव्हता. यापूर्वी त्यानं शुक्रवारी पहिल्या दिवशी सेंच्युरी पूर्ण केली होती. त्यानं दुसऱ्या दिवशी देखील त्याचा फॉर्म कायम ठेवला. आर. अश्विनला सिक्स लगावत त्यानं त्याची डबल सेंच्युरी पूर्ण केली.
इंग्लंडला मजबूत स्थितीत आणण्यात रूटच्या खेळीचा मोठा वाट आहे. रूटने पहिल्या दिवसापासून टीम इंडिया गोलंदाजांवर दबदबा कायम ठेवला. रूटने पहिले डॉम सिब्लीसह २०० आणि दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्ससह शतकी भागीदारीने सामन्यात इंग्लंड संघाला मजबुती मिळवून दिली. यापूर्वी, रूटने शानदार दीडशे धावा पूर्ण करत कसोटी क्रिकेटमध्येही मोठा कारनामा नोंदवला. इंग्लंडनं शनिवारी सकाळी ३ आऊट २६३ या धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. जो रुट आणि बेन स्टोक्स या जोडीला भारताच्या खराब खेळाची साथ मिळाली. स्टोक्सच्या दोन कॅच भारतीय फिल्डर्सनी सोडल्या. तर एकदा रुटला रन आऊट करण्याची संधी देखील गमावली. या जोडीनं चौथ्या विकेटसाठी १२४ रनची पार्टनरशिप केली. शाहबाज नदीमनं स्टोक्सला ८२ रनवर आऊट केले.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल जिंकण्यासाठी इंग्लंडला ही सीरिज मोठ्या फरकानं जिंकणे आवश्यक आहे. चेन्नई टेस्टमध्ये ६०० पेक्षा जास्त रन करण्याचा निर्धार रुटनं पहिल्या दिवसाअखेर बोलून दाखवला होता. त्याचा खेळ पाहता इंग्लंडची त्याच दिशेनं वाटचाल सुरु आहे. भारतीय बॉलर्सनं शनिवारी पहिल्या दोन सत्रामध्ये निराशा केली आहे. श्रीलंकानंतर भारताविरुद्ध द्विशतकी खेळी रूटसाठी खास ठरली. १०० व्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावांच्या बाबतीत इंझमाम-उल हक यांच्या नाबाद १८८ धावांच्या खेळीला मागे टाकले आणि सार्वधिक धावसंख्या नोंदवली. चेन्नई सामन्यात कर्णधार रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रूट १२८ धावा करुन नाबाद परतला होता. यानंतर, दुसर्या दिवशी रूटने बेन स्टोक्ससह संघाला डावात आघाडी मिळवून दिली आणि १५० धावा पूर्ण केल्या. इंग्लंड कर्णधाराने भारताविरुद्ध केलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. शिवाय, एखाद्या क्रिकेटपटूने आपल्या ९८ व्या, ९९ व्या आणि १०० व्या कसोटी सामन्यात १०० पेक्षा अधिक धावा करण्याचीही पहिलीच वेळ आहे.