Sunday, March 7, 2021
Home Sports News Cricket आयपीएल फक्त महाराष्ट्रात खेळवली जाण्याची शक्यता

आयपीएल फक्त महाराष्ट्रात खेळवली जाण्याची शक्यता

देशभरात महाराष्ट्रात सर्वाधिक स्टेडियम आहेत. त्यामुळे खेळाडूंना बायो-बबलमध्ये ठेवून कमी प्रवास करावा लागावा, यासाठी महाराष्ट्रातच आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. मुंबईमध्ये वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईत डी.वाय.पाटील आणि रिलायन्स स्टेडियम तसंच पुण्यातल्या गहुंजेच्या स्टेडियम या पाच मैदानांमध्ये आयपीएलचे साखळी सामने तर अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये प्ले-ऑफ आणि फायनल खेळवली जाऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. या दौऱ्यातल्या पहिल्या दोन टेस्ट चेन्नईमध्ये तर उरलेल्या दोन टेस्ट अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये होणार आहेत. नव्याने बांधण्यात आलेलं मोटेरा स्टेडियम हे जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये एकावेळी १ लाख १० हजार प्रेक्षक बसू शकतात. ५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टेस्टसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी वेळे अभावी आता मिळणार नाही, कारण शनिवारी सरकारची अधिसूचना मिळाली असल्याने एवढ्या कमी वेळेत तुम्ही प्रेक्षकांना प्रवेश देऊ शकत नाही. पण १४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये याचा विचार होऊ शकतो. जर बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड यांच्यात सहमती झाली, तर निदान २५ हजार प्रेक्षकांना बसण्याची परवानगी मिळू शकते. याबाबत आज बीसीसीआय आणि तामीळनाडू क्रिकेट संघाची महत्त्वाची बैठक होणार आहे.

IPL in Maharashtra

आयपीएलचा यावेळचा मोसम ११ किंवा १४ एप्रिलला सुरू होऊन ६ जूनला आयपीएलची फायनल होऊ शकते. भारत आणि इंग्लंड सीरिजमध्ये दोन्ही टीमचे खेळाडू बायो-बबलमध्ये असतील. त्यामुळे इंग्लंड सीरिजनंतर खेळाडूंना बऱ्यापैकी आराम मिळावा, या कारणासाठी आयपीएलची सुरुवात नेहमीप्रमाणे मार्चऐवजी एप्रिलमध्ये होऊ शकते. आयपीएलच्या या मोसमाआधी १८ फेब्रुवारीला आयपीएलचा लिलाव होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातला दौरा संपल्यानंतर आयपीएलला सुरूवात होणार असून मागच्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये खेळवण्यात आली होती. यंदाच्या वर्षी मात्र बीसीसीआय  आयपीएल भारतातच खेळवण्यासाठी इच्छूक आहे. युएई हा यावेळी शेवटचा पर्याय असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. देशात कोरोनाचे रुग्ण सतत कमी होत आहेत आणि लसही आली आहे. बीसीसीआय खेळाडूंच्या व्हॅक्सिनविषयी भारत सरकारशी चर्चा करत आहे. मंडळ कुठल्याही प्रकारची जोखीम घेऊ इच्छित नाही. त्यामुळे आयपीएलचे सामने आठ ऐवजी ३ किंवा ४ ठिकाणी आयोजित केले जाऊ शकतात. कारण, धोका टाळता येईल. मंडळाने टी-२० मुश्ताक अली ट्रॉफीचे सहा ठिकाणी सामने घेतले. लीग सुरू करण्याचा निर्णय आयपीएल गर्व्हनिंग कौन्सिलच्या बैठकीत घेतला जाईल. मात्र, ११ एप्रिलपासून स्पर्धेला सुरुवात होईल. कोरोना व्हायरसमुळे यावेळची आयपीएल भारतभर न खेळवता फक्त महाराष्ट्रातच खेळवली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments