भारताचा क्रिकेटपटू पार्थिव पटेलने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पार्थिवने जेव्हा भारतीय संघाकडून कसोटीत पदार्पण केले होते तेव्हा तो सर्वात कमी वयाचा विकेटकिपर होता. गेल्या १८ वर्षांपासून क्रिकेट क्षेत्रात सुरु असलेला प्रवास मी आता थांबवत आहे. हे सांगतान माझे मन भरून आले आहे. त्याचवेळी मी अनेकांचा ऋणीही आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एका १७ वर्षांच्या मुलाला भारतीय संघात स्थान देण्याचा विश्वास दाखवला. माझ्या कारकीर्दीत बीसीसीआयने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मी सदैव त्यांचे आभारी असल्याचे पार्थिव पटेलने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
२०११ चा वेस्ट इंडिज दौ-यामध्ये भारताचा कर्णधार आणि विकेटकीपर एम एस धोनीसह सचिन तेंडुलकर आणि जहीर खान यांना वेस्ट इंडिज दौऱ्यात विश्रांती दिली होती. तेव्हा वृद्धीमान साहा सोबत पार्थिव पटेलला भारतीय संघात संधी दिली होती. तेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण केले होते. या एकमेव सामन्यात पटेलने २० चेंडूत २६ धावा केल्या होत्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पार्थिव गुजरातकडून खेळायचा. भारतीय संघात संधी मिळण्याचे पार्थिवने अनेकदा प्रयत्न केले. पण त्याला यश आले नाही. त्यानंतर तो आय.पी.एल आणि देशांतर्गत क्रिकेट खेळू लागला. २०१५ च्या आयपीएलमध्ये त्याने ३३९ धावा केल्या होत्या. तेव्हा मुंबई संघाकडून त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याच वर्षी मुंबई संघाने आयपीएलचे विजेतेपद देखील मिळवले होते.
पार्थिवने भारतीय संघाकडून २५ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने ३१.१३ च्या सरासरीने ९३४ धावा केल्या. यात ६ अर्धशतकाचा समावेश आहे. ७१ ही त्याची सर्वोत्तम खेळी असून त्याने ६२ कॅच आणि १० स्टपिंग केले. ३८ वनडेत त्याने २३.७४ च्या सरासरीने ७३६ धावा केल्या. ९५ ही त्याची वनडेतील सर्वेत्तम खेळी आहे. पार्थिवने वनडेत ३० कॅच तर ९ स्टपिंग केले आहेत. प्रथम श्रेणीत त्याने १८७ सामन्यात ४३.३६ च्या सरासरीने १० हजार ७९७ धावा केल्या. २०६ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. प्रथम श्रेणीत त्याने २६ शतक आणि ५९ अर्धशतक केली आहेत. तर ४६६ कॅच आणि ७६ स्टपिंग केलेत.
टीम इंडिया कडून त्याने अखेरचा सामना २०१८ मध्ये दक्षिण आफ्रीके विरोधात जोहान्सबर्गमध्ये खेळला होता. त्याने टीम इंडीयासाठी शेवटचा वनडे २०१२ मध्ये खेळला होता. श्रीलंकेविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये आणि अखेरचा टी-२० इंग्लंड विरोधामध्ये २०११ मध्ये खेळला होता.