Sunday, February 28, 2021
Home Sports News कुस्तीमध्ये हरियाणातील आघाडीच्या कुस्तीपटूंमध्ये सोनमचं नाव

कुस्तीमध्ये हरियाणातील आघाडीच्या कुस्तीपटूंमध्ये सोनमचं नाव

हरियाणाच्या सोनम मलिकचं लहानपण मोठ्या खेळाडूंच्या सहवासातच गेलेलं आहे. तिचा जन्म हरयाणाच्या सोनिपत जिल्ह्यात मदिना गावात १५ एप्रिल २००२ रोजी झाला. या भागात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू वास्तव्याला आहेत. त्यामुळे या खेळाडूंसोबत क्रीडाविषयक चर्चा, सराव, त्यांच्याकडून खेळाचे धडे घेणं या गोष्टी तिने लहानपणापासूनच प्रत्यक्ष अनुभवल्या. या खेळाडूंच्या सहवासातच तिला ऑलिंपिक पदक जिंकण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे यासाठी ती सातत्याने प्रयत्न करताना दिसते. सोनमचे वडील आणि तिची चुलत भावंडं कुस्तीपटू आहेत. त्यांना पाहतच ती या खेळाकडे आकर्षित झाली. सोनमच्या वडिलांच्या मित्राने गावातच एक कुस्ती प्रशिक्षण केंद्र उघडलं होतं. तीथे जाऊन कुस्तीचे धडे गिरवण्यास सोनमने सुरुवात केली. सुरुवातीला या प्रशिक्षण केंद्रात कुस्तीसाठी आवश्यक असणारं मॅट उपलब्ध नव्हतं. त्यामुळे सर्वांना जमिनीवरच सराव करावा लागत असे. पावसाळ्यात या मैदानात सगळा चिखल व्हायचा. पण सराव सुटू नये यासाठी इथले खेळाडू रस्त्यावर येऊन कुस्ती खेळायचे.

२०२० मध्ये जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ६२ किलो वजनी गटातील एका स्पर्धेत तिने यशस्वी पुनरागमन केलं. या स्पर्धेत सोनमने रिओ ऑलिंपिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावणाऱ्या साक्षी मलिक हिला दोनवेळा पराभूत केलं. या विजयामुळे सोनम मलिक टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्या साठीच्या चाचणी फेरीसाठी पात्र ठरली आहे. आता या स्पर्धेत विजय मिळवून ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा विश्वास सोनमला आहे. केवळ स्पर्धेसाठी पात्र होऊन आपण थांबणार नसून पदक मिळवल्याखेरीज आपण परतणार नसल्याचं सोनमला वाटतं. देशभरात आपलं नाव गाजवल्यानंतर आता सोनमची नजर टोकियो ऑलिंपिक पदकावर असणार आहे. सोनम मलिकने आतापर्यंत ऑलिंपिक खेळांमध्ये सहभाग नोंदवलेला नाही. पण ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या साक्षी मलिक हिला एक नव्हे तर सलग दोन वेळा हरवण्याची किमया तिने करून दाखवलेली आहे. तब्बल दोन वेळा ऑलिंपिक पदकविजेत्या खेळाडूला मात देण्याची कामगिरी सोनमच्या नावावर आहे. त्यामुळेच सोनम मलिकला कुस्तीतील ‘जायंट किलर’ असं संबोधलं जातं.

२०१६ मध्ये झालेल्या नॅशनल गेम्समध्ये सोनमने सुवर्णपदक पटकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या पदकाने तिच्या आत्मविश्वासात भर पडली. या स्पर्धे दरम्यान तिने आपल्या आणि इतरांच्या खेळाचं सूक्ष्म निरीक्षणही केलं. या काळात आपल्याकडून घडलेल्या चुकांवर तिने काम केलं. तसंच सुयोग्य सरावाने आपल्या खेळात सुधारणा होऊ शकते, ही बाबही सोनमच्या लक्षात आली. २०१७ मध्ये तिने पुन्हा जागतिक कॅडेट चँपियनशीप स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरून आपल्यातील क्षमता सिद्ध केली. या स्पर्धेतील तिच्या कामगिरीबद्दल तिला आऊटस्टँडींग परफॉर्मन्स अवार्डनेही गौरवण्यात आलं. या विजयाने तिच्या भविष्याची वाट सुकर झाली. या स्पर्धेनंतर तिला स्पॉन्सरशीप मिळाले शिवाय ऑलिंपिक चाचणी स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधीही तिला मिळाली. हरयाणातील आघाडीच्या कुस्तीपटूंमध्ये सोनमचं नाव घेतलं जाऊ लागलं.क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी सोनमला तिच्या वडिलांचा तसंच इतर कुटुंबीयांचा संपूर्ण पाठिंबा लाभला. तिच्या मते, मुलींनी खेळांमध्ये यश मिळवायचं असेल तर कुटुंबाचा पाठिंबा असणं महत्त्वाचं असतं.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments