Monday, March 1, 2021
Home Sports News Cricket इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

भारतात परतलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना क्वॉरनटाइनच्या नियमातून वगळण्यात आलं आहे. परंतु विमानतळावरच प्रत्येक खेळाडूची आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट संघ मायदेशी परतला आहे. यावेळी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मुंबई विमानतळावर परतलेल्या खेळाडूंसाठी क्वॉरनटाइनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. खेळाडूंना विलगीकरणात न ठेवण्याबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत फोन केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियातून विजय मिळवून मुंबईत परतलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना विलगीकरणात न ठेवण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश महापालिकेला दिले. त्यांची विमानतळावरच आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना थेट घरी जाण्यास परवानगी देण्यात आली.

टीम इंडियाचे पुढचे काही सामने चेन्नईला होणार आहेत. त्याआधी खेळाडूंना कुटुंबासमवेत काही वेळ घालवायचा होता. परंतु परदेशातून आल्यामुळे नियमानुसार त्यांना क्वॉरनटाइन करावे लागले असते. मात्र शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर खेळाडूंना क्वॉरनटाइन न करण्याचा निर्णय घेण्यात आला.  इंग्लंड विरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी कसोटी सामना खेळणारा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरलाही इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. सुंदरने पदार्पणाच्या कसोटीत गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींमध्ये चमकदार कामगिरी केली. याचं बक्षिस म्हणून त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली. सुंदरने पहिल्या कसोटीत चार विकेट आणि ८४ धावा केल्या. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा मोहम्मद सिराजलाही इंग्लंडविरूद्ध संधी देण्यात आली आहे. सिराजने कांगारूंच्या विरोधात केवळ तीन कसोटी सामन्यात १३ विकेट घेतल्या.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी अष्टपैलू हार्दिक पांड्याही संघात परतला आहे. त्याने शेवटची कसोटी इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट २०१८ मध्ये खेळली होती. भारतीय खेळपट्ट्यांवर हार्दिक खूप प्रभावी ठरू शकतो. कसोटी क्रिकेटच्या ११ सामन्यात शतकी खेळीसह त्याने ५३२ धावा आणि १७ गडी बाद केले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा भारतीय संघात परतला आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना वेगवान गोलंदाज म्हणून स्थान मिळालं आहे. त्याचबरोबर आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना फिरकीपटू म्हणून स्थान देण्यात आलं आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, अष्टपैलू रवींद्र जाडेजा आणि मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारी हेदेखील दुखापतीमुळे या संघाचा भाग नाहीत. तथापि, उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी या खेळाडूंचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments