Monday, March 1, 2021
Home Sports News Cricket टीम इंडियामध्ये काहीशी नाराजगी

टीम इंडियामध्ये काहीशी नाराजगी

रोहित शर्मासह टीम इंडियाच्या पाच खेळाडूंची कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याच्या चर्चा मागील दोन दिवसांपासून सुरू आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या प्रकरणाचा तपास करण्याची तयारी दर्शवली असताना रोहित, रिषभ पंत, पृथ्वी शॉ, शुबमन गिल आणि नवदीप सैनी यांना आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले आहे. पण, या पाच खेळाडूंसह टीम इंडियाच्या सर्व सदस्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून संघ सिडनी येथे दाखल झाला आहे. भारतीय खेळाडूंची रविवारी कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यात सर्व सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर टीम इंडियाला मेलबर्नवरून सिडनीस रवाना होण्याची परवानगी मिळाली. भारतीय संघानं सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याची तयारी दर्शवली आहे, पण क्रिकेटपटू व फॅन्ससाठी समान नियम असायला हवं, अस मत टीम इंडियाने व्यक्त केलं. ”तुम्ही फॅन्सना मैदानावर येण्याची परवानगी देता, त्यांना स्वातंत्र्य देता आणि त्याचवेळी खेळाडूंना हॉटेलमध्ये राहण्यास व क्वारंटाईन होण्यास सांगता, हा विरोधाभास आहे. विशेष म्हणजे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही या सूचना. प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांप्रमाणे वागणूक आम्हाला नकोय,”असे टीम इंडियाच्या सूत्रांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले,”आम्ही सुरुवातीपासून सांगतोय, आम्ही ऑस्ट्रेलियन नागरिकांसाठी असलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करू. त्यामुळे जर प्रेक्षकांना मैदानावर परवानगी नसेल, तर खेळाडूंना हॉटेलमध्ये क्वारंटाईन राहण्यास सांगण्याला अर्थ आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वैद्यकिय टीमनं आम्हाला हॉटेल रुमच्या बाहेर पडू नका असे सांगितले आहे. त्यावर संघ व्यवस्थापनातील वरिष्ठ सदस्यानं नाराजी व्यक्त केली.” नवीन वर्षाला रोहित शर्मा, रिषभ पंत, शुबमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी यांनी मेलबर्न येथील रेस्टॉरंटला भेट दिली. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यानं त्यांचा व्हिडीओ पोस्ट केला व खेळाडूंनी बायो-बबल नियम मोडल्याची चर्चा सुरू झाली. बीसीसीआयने सोमवारी सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफ सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली. तिसरी कसोटी ७ जानेवारीपासून सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियातील सदस्य नको त्या कारणामुळे चर्चेत आले. भारतीय संघातील पाच सदस्यांवर बायो-बबल नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला गेला. त्यामुळे खेळाडूंनी बायो-बबल नियमांचं काटेकोर पालन करावं, अशा सूचना क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून खेळाडूंना करण्यात आल्या. या सर्व नाट्यमय घडामोडींत ऑस्ट्रेलियाच्या एका मंत्र्यानं तर नियमांचे पालन करणार नसाल, तर परत जा अशी धमकीच भारतीय खेळाडूंनी दिली. तर, भारतीय संघाने तक्रार करणे थांबवावे, असा सल्ला ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियॉन याने दिला. कोरोनाच्या कठोर नियमांमुळे ब्रिस्बन कसोटीचं ठिकाण बदलण्याची विनंती बीसीसीआयनं केल्याची चर्चा होती. त्यावरून लियॉन म्हणाला, नियमांचं पालन करा आणि पुढे जा, भारतीय खेळाडूंनी चूक केली. त्यांनी ती मान्य करायला हवी आणि ही चर्चा इथेच थांबवायला हवी. पुढील सामन्यावर लक्ष केंद्रीत करा आणि हा मुद्दा भरकटवू नका. त्याचवेळी सिडनी कसोटीसाठी २५ टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. टीम इंडियाला हे वागणं काही पटलेलं दिसत नाही. 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments