Thursday, February 25, 2021
Home Sports News Cricket मिताली राजच्या जीवनपटावर साकारणार चित्रपट

मिताली राजच्या जीवनपटावर साकारणार चित्रपट

भारताची दिग्गज महिला फलंदाज मिताली राजच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मितालीची भूमीका अभिनेत्री तापसी पन्नू साकारणार आहे. या चित्रपटासाठी तापसीने क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासही सुरुवात केली आहे. ‘शाब्बास मिथू’ असे या  चित्रपटाचे नाव ठरवण्यात आले आहे. खेळाडूंच्या जिवनावर येणारे चित्रपट ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. आत्तापर्यंत अनेक स्टार खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यात आले आहेत. यात मिल्खासिंग,  मेरी कोम,  एमएस धोनी,  फोगट भगिनी, अशा अनेक खेळाडूंवरील चित्रपटांचा समावेश आहे. आता यात आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. सन २०१९ ला ३ डिसेंबर रोजी मितालीच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर चित्रपट चित्रित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी तापसीने सोशल मीडियावर मिताली बरोबर केक कापतानाचा फोटो शेअर करताना चाहत्यांना ती मितालीची भूमिका निभावणार असल्याची गुड न्यूज दिली होती.

कोण आहे मिताली राज, पाहूया तिच्या बद्दल थोडक्यात माहिती. ३ डिसेंबर १९८२ रोजी जन्मलेली मिताली भारतीय महिला वनडे क्रिकेट संघाची कर्णधार आहे. तसेच ती वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला खेळाडू आहे. आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या बळावर मितालीने मैदानावर अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आपल्या देशाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. आपल्या देशात महिला क्रिकेटला प्रसिद्ध बनविले. तिच्या कामगिरीमुळे आणि यशामुळे जगात तिला  महिला क्रिकेटचा तेंडूलकर म्हटले जाऊ लागले. जोधपूरमध्ये जन्मलेल्या मितालीने जून १९९९ मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन दशकांहून अधिक काळ व्यतीत करूनही ती अजूनही सक्रिय आहे. तिने आत्तापर्यंत २०९ वनडे सामन्यांमध्ये ६८८८ धावा केल्या आहेत. तसेच तिने १० कसोटी सामन्यांत ६६३ धावा केल्या आहेत आणि ८९ टी-२० सामन्यांत तिने २३६४ धावा केल्या आहेत.

कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीची भूमिका निभावण्यासाठी त्या व्यक्तीच्या आयुष्याला जवळून बघण्याची आणि अनुभवायची गरज असते. तापसी पन्नूने नुकतेच तिच्या क्रिकेट प्रशिक्षणा दरम्यानचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यात ती हातात बॅट घेऊन फलंदाजी करण्याच्या तयारीत दिसत आहे. तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे की “आणि बॅट आणि बॉलमधील रोमान्सला सुरुवात झाली आहे. अजून दूरचा प्रवास करायचा आहे,  पण चांगली सुरुवात झाली आहे, अर्धे काम पूर्ण झाल्यासारखेच असते. हा चित्रपट एक मैलाचा दगड ठरणार आहे. हे आपल्या ‘कॅप्टनकूल’ मिताली राज आणि तिच्या भारतीय संघासाठी आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments