क्रीडा क्षेत्रात ज्यांनी भारताची प्रतिमा उंचावली अशी दोन व्यक्तिमत्व म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद आणि कुस्तीतले पैलवान खाशाबा जाधव. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आपण क्रीडादिवस म्हणून साजरा करतो. मराठमोळ्या खाशाबांचं आयुष्य काही कमी प्रेरणादायी नाही. ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक मेडल मिळवून देण्याचा मान त्यांच्याकडे जातो.
खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संजय दुधाणे यांनी ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ या नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात मेडल जिंकलेल्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. ‘ऑलिम्पिक स्पर्धा संपायला फक्त २-३ दिवसच बाकी होते. बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान आटोपलेलं होतं. त्यामुळे संघाबरोबर असलेले व्यवस्थापक दिवाण प्रतापचंद यांना शहर बघण्याची घाई झाली होती. इतरांनाही युरोपातलं हे शहर मनसोक्त भटकायचं होतं. दुधाणे आपल्यासमोर तो दिवस उभा करतात. या पर्यटनाच्या नादात प्रतापचंद खाशाबांच्या मॅचचा दिवसही विसरले. आणि उलट खाशाबांना म्हणाले, तुझी मॅच उद्या आहे. तेव्हा आज तू आमच्याबरोबर हिंडायला चल. खाशाबा मात्र एका मनसुब्याने हेलसिंकीत आले होते. त्यांचं लक्ष कुस्ती सोडून इतर कुठेही नव्हतं. त्यांनी फिरायला नकार दिला आणि रिकाम्या वेळात इतर पैलवानांचे सामने बघतो असं सागून ते मैदानाच्या दिशेनं निघाले. किट कुठे ठेवायचं म्हणून ते त्यांनी बरोबर घेतलं. इतर दोन पैलवानांचा सामना सुरू असताना एक विचित्र गोष्ट घडली. खाशाबांना त्यांचं नाव ध्वनीक्षेपक यंत्रातून ऐकू आलं. खरंतर इंग्रजी समजणं कठीणच होतं. पण, नशिबाने जाधव हे आडनाव त्यांना कळलं. त्यांनी चौकशी केली. तर पुढचा सामना त्यांचा असल्याचं त्यांना कळलं. जाधव यांच्याबरोबर तेव्हा भारतीय संघातील कुणीही नव्हतं. वेळ तर अजिबात नव्हता. तयार होऊन कुस्तीसाठी उतरायचं हा एकमेव पर्याय होता. शेवटी जाधव सामन्यासाठी मॅटवर उतरले. नशिबाने पहिला प्रतिस्पर्धी न आल्यामुळे बाय मिळाला. त्यानंतर कॅनडा, मेक्सिको आणि जर्मनीच्या मल्लांवर त्यांनी लीलया मात केली. मॅचची तयारीही त्यांनी केलेली होती. पण, प्रत्यक्ष मॅटवर ही लढत तासभरापेक्षा जास्त चालली. आणि खाशाबांना ०-३ असा पराभव पत्करावा लागला.
काही जाणकारांच्या मते, मॅचमध्ये पंचांचे काही निर्णयही खाशाबांच्या विरुद्ध गेले असा उल्लेख संजय दुधाणे यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. ही मॅरेथॉन लढत खेळून खाशाबा दमले होते. पण, पुढच्या पंधरा मिनिटांत त्यांना पुढची फेरी खेळावी लागली. खरंतर ऑलिम्पिक स्पर्धेत दोन सामन्यांमध्ये किमान अर्ध्या तासाची विश्रांती आवश्यक आहे. स्पर्धेचा तसा नियमच आहे. हे सगळं नाट्य घडत असताना खाशाबा एकटेच तिथे होते. संघाचे व्यवस्थापक नव्हतेच. त्यामुळे त्यांची बाजू मांडायला कुणी नव्हतंच. शिवाय खाशाबांना इंग्रजी तितकंसं जमत नव्हतं. कुस्ती लढायचं तेवढं त्यांना ठाऊक. त्यामुळे त्यांनी प्रतिकारही नाही केला. जपानच्या शोहोची इशी या मल्लाबरोबर खेळायला ते मॅटवर उतरले. पण, शरीर इतकं दमलं होतं की थोड्या वेळातच ०-३ असा त्यांचा पराभव झाला. रशियाला सुवर्ण मिळालं आणि भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.