Monday, March 1, 2021
Home Tech News फेसबुक आणि ॲपलचे कोल्ड वॉर

फेसबुक आणि ॲपलचे कोल्ड वॉर

अॅपल आणि फेसबुकमधला हा वादा गेल्या एक-दोन वर्षातला नाही. अॅपलचे संस्थापक स्टिव्ह जॉब्ज यांनी २०१० सालीच फेसबुकला गोपनीयतेवरून वारंवार सुनावले होते. तर २०१८ साली अॅपलचे विद्यमान मालक टीम कुक यांनी “फेसबुकच्या पावलावर पाऊल ठेवून नफा कमावण्यासाठी जाहिराती दाखवण्याचा मार्ग अॅपललाही स्वीकारता आला असता मात्र आम्ही तसे न करण्याचा निर्णय घेतला”, असे म्हटले होते. फेसबुक आणि अॅपल या दोन कंपन्यां मधील वैर दिवसेंदिवस वाढतच आहे. या दोन तंत्रज्ञान कंपन्या आहेत, एवढं साम्य वगळले असता त्यांचा व्यवसाय पूर्णत: वेगवेगळा आहे.

फेसबुकचा सर्व महसूल हा जाहिरातीतून येतो तर अॅपलला जाहिरातीतून मिळणारा महसूल अत्यल्प आहे. अॅपलला जो पैसा मिळतो तो प्रामुख्याने त्यांच्या डिव्हाईसेस आणि अॅप स्टोरमधून येतो. त्यामुळे या दोन कंपन्यांमध्ये थेट स्पर्धा नाही. फेसबुक जाहिरातींच्या माध्यमातून पैसा कमवत असल्यामुळे फेसबुक आपल्या यूजर्सला ग्राहक मानतो, असं अॅपलचे टिम कुक यांचे म्हणणे आहे. इतकंच नाही तर फेसबुक यूजर्सच्या गोपनीयतेशी खेळत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. तर अॅपलची उत्पादनं महागडी आहेत आणि फेसबुकवर टीका करण्याचा त्यांचा छुपा हेतू आहे, असं फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांचं म्हणणं आहे.

या दोन कंपन्यांच्या वादामध्ये मागील आठवड्यात नव्या मुद्द्याची भर पडली आहे. यावर्षीच्या सुरुवातीला अॅपलने एक नवीन फिचर आणणार असल्याची घोषणा केली होती. ‘अॅप ट्रॅकिंग ट्रान्स्परंसी’ असे या नवीन फिचरचं नाव आहे. लोकांना त्यांच्या खाजगी डेटावर अधिक नियंत्रण ठेवता यावं, हा या फिचरचा उद्देश आहे. फेसबुक किंवा इतर कुठलंही अॅप वापरण्यासाठी पूर्वी यूजरची जी माहिती न विचारता घेतली जायची ती माहिती घेण्यासाठी यूजरची परवानगी आवश्यक करणारं हे फिचर आहे. मात्र, टार्गेटेड जाहिराती दाखवून बक्कळ नफा कमावणाऱ्या फेसबुकसाठी ही खरी अडचण निर्माण झाली आहे. या फीचरमुळे आपल्या व्यवसायाचं मोठं नुकसान होईल, असं फेसबुकने जाहीरपणे म्हटलं आहे. तिकडे अॅपलनेही डेव्हलपर्सना तयारी करण्यासाठी हा प्रस्ताव पुढच्या वर्षीपर्यंत लांबणीवर टाकला आहे.

अॅपलने गेल्या आठवड्यात एक पत्र जारी करत नवे बदल वर्षभर लांबणीवर का टाकले, याचं कारण स्पष्ट केले आहे. “शक्य तेवढा डेटा गोळा करण्याचा त्यांचा इरादा असल्याचे फेसबुकने स्पष्ट केलं आहे. मात्र, यामुळे यूजरच्या गोपनीयतेकडे दुर्लक्ष होत आहे”, असं या पत्रात म्हटलं आहे. याला फेसबुकनेही उत्तर दिलं आहे. “मार्केटमधील स्वतःचे वर्चस्व वापरून केवळ स्वतःलाच डेटा मिळावा, यासाठीचा हा प्रयत्न आहे. मात्र, यामुळे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना तोच डेटा मिळवणं जवळपास अशक्य होईल.” इतकंच नाही तर “आपण गोपनीयतेसाठी हे फिचर आणत असल्याचं त्यांचं म्हणणं असलं तरी यामागचा मूळ उद्देश नफा कमावणे हाच आहे”, असंही फेसबुकनेही प्रत्युत्तरादाखल स्पष्ट केलं आहे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments