Sunday, March 7, 2021
Home Tech News ट्वीटरने केली ५५० हून अधिक खाती बंद

ट्वीटरने केली ५५० हून अधिक खाती बंद

दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर तंत्रज्ञान आणि मानवी पुनरावलोकनाच्या पद्धतीचा वापर करुन ट्विटरने मोठ्या प्रमाणात काम केलं. त्यानंतर ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणारी शेकडो खाती तसेच स्पॅम खाती अशा जवळपास ५५० हून अधिक खात्यावर बंदी आणल्याची माहिती ट्विटरच्या प्रवक्त्याने दिली आहे. ट्विटरच्या ‘सिंथेटिक अॅन्ड मॅनिप्यूलेटेड मीडिया पॉलिसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने या सर्व अकाउंटवर बंदी घातल्याचं स्पष्टीकरण ट्विटरकडून देण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला प्रवृत्त करणे आणि ट्विटरच्या नियमाचे पालन न करणे यामुळेच संबंधित अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे.

दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या ट्रक्टर परेडला परवानगी देण्यात आली होती. पण नियोजित मार्गाचा वापर न करता काही आंदोलकांनी बॅरिकेट्स तोडले आणि ते दिल्लीच्या इतर भागात घुसले. त्यानंतर दिल्लीमध्ये मोठा हिंसाचार उफाळला. काही आंदोलकांनी दिल्लीच्या लाल किल्यावर जाऊन शीख समाजाचा ध्वज फडकावला. या दरम्यान सार्वजनिक मालमत्तेच मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले. तसेच ३०० हून जास्त पोलीस यामध्ये जखमी झाले आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एकूण २२ एफआयआर दाखल केल्या असून या हिंसाचाराचा तपास आता दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रॅन्चच्या विशेष तपास पथकाकडे देण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये योगेंद्र यादव यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्याशिवाय राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर आणि सतनामसिंग पन्नू यांचीही नावं एफआयआरमध्ये नाव आहे. या नेत्यांव्यतिरिक्त पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू आणि लखबीरसिंग उर्फ ​​लखा सिधाना हे देखील दिल्ली पोलिसांच्या नजरेत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत २६ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान दिल्लीत झालेल्या हिंसाचाराची दखल आता ट्विटरनेही घेतली आहे. ट्विटरकडून परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करण्यात येत आहे आणि त्यासंबंधी अधिक जागरुकतेने काम करण्यात येत आहे, जर अशा पद्धतीने कोणी नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. या प्रकरणी बुधवारी ट्विटरने जवळपास ५५० हून जास्त अकाउंटवर बंदी आणली आहे. हे सर्व अकाउंट दिल्लीतील हिंसाचाराशी संबंधित असल्याचं ट्विटरने स्पष्ट केले आहे. आणि अशा प्रकारच्या लोकांवर कारवाया करायला ट्वीटर कायमच सक्रीय राहील असे स्पष्ट करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments