येलोंदेवाडी येथील लघुपाटबंधारे प्रकल्पामुळे शिरवली व देवखेरकी परिसरातील ११० घरे धोक्यात आली आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले आहे. येलोंदेवाडी येथील लघुपाटबंधारे प्रकल्पामुळे या परिसरातील ११० घरे अधिकृत बुडीत क्षेत्राबाहेर शिल्लक राहिली आहेत. ती प्रस्तावित जलाशयाच्या अगदी जवळ असल्याने त्यांच्याभोवती तिन्ही बाजूंनी पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. त्या घरांकडे जाणारा मुख्य रस्ताही बुडीत क्षेत्रातून जात असल्याने पर्यायी मार्ग उपलब्ध करणे अशक्य आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य शिवानी सावंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन तेथील घरांचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली आहे. धरणाच्या जलाशयाचे पाणी घरांच्या तिन्ही बाजूंनी साचल्यास स्थानिक नागरिकांना जलचर तसेच जंगली प्राण्यांपासून धोका निर्माण होऊ शकतो.
पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात गंभीर आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. तेथील घरे डोंगरउतारावर आणि जलाशयाच्या काठावर असल्यामुळे पाण्याच्या माऱ्याने मातीची धूप व भूस्खलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबांच्या जीवित व मालमत्तेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.
