अक्षय म्हणजे जिचा क्षय होत नाही, अशी एखादी वस्तू किंवा स्थिती म्हणता येईल. अशा अनेक गोष्टी असतात ज्यांचा आयुष्यातून कधीच क्षय होऊ नये असे आपल्याला वाटत असते. जसे कि, घरातील स्वयंपाक घर कायम भरलेलं असावं म्हणतात, कधीही कोणत्या गोष्टीचा तुटवडा पडता कामा नये, पाणी, मीठ, तेल, तांदूळ यांची कधीही स्वयंपाक घरामध्ये कमतरता जाणवू देऊ नये. एखाद्या वेळेला संपल म्हणून आणायला उशीर झाला तर तो मात्र अपवाद ठरू शकतो, परंतु, घरातील गृहिणीचे या सर्व लहान सहान गोष्टीकडे पण अगदी बारीक लक्ष असते. त्यानंतर आपल्या घरातील लक्ष्मी, संपत्ती. पैसा कितीही कमावला तरी तो कमीच पडत असतो. त्यामुळे त्याचा बेजबाबदारपणे वापर न करता भविष्याचा विचार करून त्याचा साठ करणे गरजेचे असते. जे लक्ष्मीची उधळपट्टी करणारे असतात त्यांच्याकडे लक्ष्मी वास्तव्य करत नाही. या अक्षय तृतीयेला लक्ष्मी अक्षय घरात राहावी यासाठी काही उपाययोजना पाहूया.
वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. यादिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याच्या पहिल्या उपायामध्ये हळद आणि तांदूळाचा हा उपाय उपयुक्त आहे. या उपायामध्ये एका वाटीमध्ये हळद आणि मोहरीचे तेल घ्या, तर दूसऱ्या वाटीत तांदूळ घेऊन ते लक्ष्मी मातेच्या पूजनामध्ये ठेवा. नंतर मनोभावे प्रार्थना करून घराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हळदीने स्वस्तीक काढा आणि मधोमध तांदूळ गोलाकार ठेवा. रात्रभर हे स्वस्तीक आणि तांदूळ आहे त्या स्थितीमध्येच राहू द्या. दूसऱ्या दिवशी हे तांदूळ एकतर पक्ष्यांना खाऊ घालावे किंवा वाहत्या नदीमध्ये पाण्याबरोबर प्रवाहात सोडून द्यावे. हा उपाय केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होऊन तिचा आशिर्वाद लाभतो त्यासोबतच उद्योग व्यवसायामध्ये भरभराट होते आणि हातात लक्ष्मी टिकून राहते.
साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेला हा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय्य तृतीयेला सोनं चांदी घेण्याला विशेष महत्व आहे. लक्ष्मी मातेची कृपा सदैव आपल्यावर रहावी याकरीता सोनं चांदी घेतांना नाण किंवा वळ न घेता, सोनं किंवा चांदीच्या लक्ष्मी मातेच्या पावलांची खरेदी करावी आणि आपल्या घरातील धनधान्य, लक्ष्मी आपण जिथे ठेवतो तिथे त्या पावलांनाही तिथे स्थापन करावे. यामुळे लक्ष्मीमातेचे आशीर्वादरूपी चरण व आशिर्वाद नेहमी आपल्या वास्तूत टिकून राहतात आणि आर्थिक वृद्धी होण्यास मदत होते.
अक्षय्य तृतीयेला कवड्यांचा उपाय केल्यास तो अधीक फलदायी ठरू शकतो. यासाठीचा एक सोपा उपाय म्हणजे असा आहे की एका लाल वस्त्रात ११ कवड्या घ्या आणि त्या बांधून पूजेच्या स्थानी ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून त्या कवड्या आपण जिथे धनधान्य संपत्ती आदी जिथे ठेवतो त्या स्थानी ठेवल्याने धनधान्यात बरकत होउन, आर्थिक मंदी संपुष्टात येते आणि लक्ष्मीच्या कृपेने धनवृद्धी कायम होत राहते.
अक्षय्य तृतीयेला केलेल्या दानाला सुद्धा विशेष महत्व प्राप्त आहे. पितराना प्रसन्न करण्यासाठी तसेच त्यांना मोक्ष मिळवून देण्यासाठी या दिवशी दान करण्याचे अनन्य साधारण महत्व आहे. पितरांच्या निमित्त या दिवशी उपयुक्त वस्तू अशा पंखा, चप्पल, छत्री, काकडी,घागर, डांगर यांचे दान करण्यास महत्व आहे. तसेच या दिवशी ब्राम्हणास फळे, साखर,तूप दान केल्याने शुभ फळप्राप्ती होते, असे पुराणात म्हटले आहे. तसेच दान केल्याने विष्णू देवांसोबत लक्ष्मी मातेचीही कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहते.
कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्रीफळ वाढवून केली जाते, लक्ष्मी मातेला सुद्धा नारळ प्रिय असल्याचे मानले जाते. अक्षय्य तृतीयेला पूजेमध्ये नारळची स्थापना केल्यास धनलाभ होतो असा मानस आहे. तुम्हाला सध्या जर धनधान्याची कमतरता जाणवत असेल तुम्ही काळजी करण्याच कारण नाही, सकारात्मक भाव ठेवून लक्ष्मी मातेच्या चरणी एकाक्षी नारळ स्थापित करून पूजा केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होउन आणि तुम्हाला कधीच धनधान्याची कमतरता जाणवणार नाही. वरील सर्व उपायाने अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही, प्रत्येकाने वैयक्तिकपणे विश्वास असेल तर करून पहावा. कोणताही उपाय करताना सकारात्मकता आणि निस्सीम श्रद्धा महत्वाची.