खेड तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, बुधवार २१ जानेवारी रोजी, विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी, खेड यांच्याकडे सादर केले. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जिल्हा परिषदसाठी अखेरच्या दिवशी तब्बल ९ अर्ज दाखल झाले. पंचायत समिती निवडणुकीसाठी आज अखेरच्या दिवशी एकूण ३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. सुकवली पंचायत समिती गणातून भाजपच्या दिव्या विशाल होळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रियांका राजेश चोचे यांनी अर्ज दाखल केला. तिसंगी गणातून भाजपचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, काँग्रेसचे चंद्रकांत लक्ष्मण मोरे तसेच राजेश रामचंद्र जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरले. खवटी गणातून भाजपच्या ज्योतीं वीरसिंह बोरकर यांनी पक्षाकडून तसेच अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुहासिनी कृष्णा चिंचघरकर यांनीही उमेदवारी अर्ज सादर केला.
भरणे पंचायत समिती गणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिन निकम, भाजपचे विजय दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश जाधव, मनसेचे प्रशांत मंडलिक आणि बहुजन समाज पार्टीचे मिलिंद गमरे यांनी अर्ज दाखल केले. जामगे गणातून शिवसेनेच्या नयना वीरसेन मोरे आणि सुसंध्या संतोष मोरे यांनी उमेदवारी अर्ज भरले, तर दयाळ गणातून साक्षी महेश पालकर यांनी अपक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या करुणा शिर्के यांनी पक्षातर्फे अर्ज दाखल केला. बहिरवली गणातून माजी जिल्हा परिषद सदस्या नफीसा हशमत परकार यांच्यासह बाळकृष्ण संतोष पानवलकर आणि सलीम अब्बास तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरले. गुरुदे गणातून वंचित बहुजन आघाडीचे बबन जाधव आणि मनसेचे प्रकाश पालंडे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. वीराचीवाडी पंचायत समिती गणातून शिवसेनेचे दिलीप डेरवनकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मंगेश धुलप आणि अपक्ष दिनेश सुरेश फोफळकर यांनी अर्ज दाखल केला. लोटे गणातून भाजपचे अविनाश आंब्रे व संजय आंब्रे यांच्यासह सुभाष विश्राम हुमणे, विपुल तांबे आणि जितेंद्र आंब्रे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरले. आंबडस गणातून अपक्ष दिपाली हुमणे आणि भाजपच्या मेघना मोरे यांनी अर्ज दाखल केला, तर अंजनी गणातून वंचित बहुजन आघाडीच्या अभिलाषा सागर जाधव आणि धामणदेवी गणातून शिवसेनेच्या नंदिनी पवार यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीसाठीही आज मोठी गर्दी पाहायला मिळाली असून एकूण १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सुकवली जिल्हा परिषद गटातून भाजपच्या दिव्या विशाल होळकर, भरणे गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुहासिनी कृष्णा चिंचघरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोशनी बाळाराम साळवी यांनी उमेदवारी अर्ज भरला. दयाळ जिल्हा परिषद गटातून विजय महादेव राक्षे यांनी अपक्ष म्हणून दोन अर्ज दाखल केले असून माजी जिल्हा परिषद सदस्या नफीसा हशमत परकार यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला आहे. याच गटातून नागेश गणपत धाडवे आणि इनायुतुल्ला अब्दुल रहमान कादरी यांनी अपक्ष, तर जलालुद्दीन राजपूरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. श्रीधर रामचंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि चंद्रसेन प्रभाकर मोहिते यांनी बहुजन समाज पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. ङ्गवीराचीवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्वाती सुनील चांदिवडे यांनी तर लोटे जिल्हा परिषद गटातून भाजपच्या मनाली मंगेश कांबळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खेड तालुक्यातील दयाळ जिल्हा परिषद गटात सर्वाधिक म्हणजे तब्बल ९ ते ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने या गटात निवडणूक विशेष चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. आता उमेदवारी अर्जाची छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवडणूक रिंगणात नेमके कोण उमेदवार राहतात, याकडे संपूर्ण खेड तालुक्याचे लक्ष लागले असून पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका अत्यंत चुरशीच्या होतील, हे स्पष्टपणे दिसत आहे.

