रत्नागिरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि रत्नागिरी या चार तालुक्यांमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. २०२५ मध्ये वर्षभरात वन्यप्राण्यांनी नुकसान केल्याच्या ४२६ घटनांची नोंद झाली आहे. त्यामुळे संबंधितांना शासनाला ७२ लाख ४५ हजार रुपयांहून अधिक नुकसानभरपाई द्यावी लागली. वन्यप्राणी लोकवस्तीजवळ येऊ लागल्यामुळे शेतकरी आणि स्थानिक रहिवासी हवालदिल झाले आहेत. २०२५ या वर्षात चार तालुक्यांमध्ये पाळीव प्राण्यांवरील हल्ले, शेतीपिकांची नासाडी आणि मनुष्यावरील वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचे प्रकार वाढलेले आहेत. यामध्ये सर्वात मोठा फटका ग्रामीण भागातील पशुपालकांना बसला आहे. बिबट्या आणि इतर हिंस्र प्राण्यांनी पाळीव प्राण्यांना लक्ष केल्याच्या २६७ घटना वर्षभरात घडल्या आहेत. कोकणातील ग्रामीण अर्थकारण प्रामुख्याने पशुपालनावर अवलंबून असल्याने, या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
या पशुहानीसाठी शासनाकडून ४३ लाख ७० हजार ४५८ रुपयांची भरपाई निश्चित करण्यात आली आहे. पशुहानीसोबतच शेतीचे होणारे नुकसान ही मोठी समस्या बनलेली आहे. जंगली डुकरे, वानरे आणि माकडांच्या कळपांनी बागायती आणि शेतीपिकांची मोठी हानी केली आहे. वर्षभरात पीक नुकसानीची १५६ प्रकरणे नोंदवली गेली असून, त्यासाठी २२ लाख ९९ हजार ४६७ रुपयांच्या मदतीची तरतूद करण्यात आली आहे. वर्षभर कष्ट करून पिकवलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अनेकांनी तर वन्यप्राण्यांच्या भीतीपोटी शेती करणे सोडून देण्याचा विचार सुरू केला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानीच्या ३ घटनांची नोंद झाली आहे. त्यापोटी शासनाने ५ लाख ७५ हजार ७९ रुपयांची मदत दिली.
वनकर्मचाऱ्यांवरील ताण वाढतोय – मानवी वस्त्यांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर आता लोकांच्या जीवावर बेतू लागला आहे. सायंकाळनंतर घराबाहेर पडणे कठीण झाले असून, मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. वन विभागाने आर्थिक मदत देऊन न थांबता, या वन्यजीवांच्या वावरावर नियंत्रण मिळवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. वाढत्या घटनांमुळे वनकर्मचाऱ्यांवरील ताणही वाढलेला आहे.
काजरघाटीत वासरावर हल्ला – रत्नागिरी तालुक्यातील काजरघाटी येथे भरवस्तीत मंगळवारी (ता. ३०) रात्री गोठ्यातील वासरावर हल्ला केल्याची घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात वासराने केलेल्या आवाजामुळे घरातील लोक जागे झाले आणि बाहेर आल्यामुळे बिबट्या पसार झाला. मात्र, या हल्ल्यात वासरू जखमी झाले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले आहेत.
