सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघाचे प्रमुख भक्ष्य असलेले गवा आणि सांबर मोठ्या प्रमाणात आहेत. पाण्याचे स्त्रोत मुबलक आहेत. संपूर्ण ११६५ चौ. हेक्टर किमी क्षेत्रात ५० वाघ सहज नांदू शकतील इतके भक्षक आणि भक्ष्य दोन्ही उपलब्ध आहे. इतिहासात सह्याद्री भागात वाघांच्या शिकारीला परवानगी होती, याची उदाहरणे नोंदीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या काही दशकांत वाघसंख्या घटली आहे, असे मत सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक व वनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी व्यक्त केले. (कै.) नीलेश बापट निसर्गकट्टाअंतर्गत सुरू झालेल्या मुलाखतवजा अनुभवकथन मालिकेतील पहिल्या कार्यक्रमात ‘मुशाफिर जंगलवाटांचे’ या ते बोलत होते. ही त्यांची मुलाखत ओंकार बापट यांनी घेतली. हा उपक्रम वाईल्डलाईफ अनलिमिटेड चिपळूण आणि रत्नागिरी वनविभाग यांच्यावतीने तसेच ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सहकायनि आयोजित केला होता. कार्यक्रमाचा प्रारंभ मार्कंडी येथील वनभवनमधील निसर्गसेवक (कै.) नीलेश बापट छायाचित्रदालनात झाला. सह्याद्रीतील निसर्ग, वाघांचे स्थलांतर, बिबट्यांची वाढती संख्या, परिसंस्थेतील बदल आणि वनविभागातील तरुणांसाठीच्या संधीबाबत चव्हाण यांनी सविस्तर संवाद साधला. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील निसर्गवैभव, संपन्न जैवविविधता आणि भरपूर भक्ष्य प्राणिसंख्या यामुळे हे संपूर्ण क्षेत्र वाघांच्या मुक्त संचारासाठी अत्यंत पोषक आहे.
वनक्षेत्रात तरुणांसाठी अमर्याद संधी – वनविभागात फक्त अधिकारीच नव्हे, तर बायोडायव्हर्सिटी एक्स्पर्ट, वन्यजीव छायाचित्रकार, व्हेटरनरी डॉक्टर, संशोधक, स्वयंसेवक अशा अनेक मार्गांनी काम करता येते. निसर्गप्रेमी तरुणांना इथे मोठ्या प्रमाणात संधी आहे.
सह्याद्रीत ९० बिबटे, एआय जनरेटेड हल्ले – सह्याद्री परिसरात सध्या ९० बिबटे आहेत. बिबट्यांचा संघर्ष वाढतोय, असे म्हटले जाते; पण यामागे कारण माणूसच आहे. वस्तीमध्ये भटके कुत्रे असतात किंवा ते सोडले जातात, जे बिबट्याचे मुख्य भक्ष्य आहे. कुत्र्यांमागे बिबटे वस्तीपर्यंत येतात आणि मग त्यांना ‘बिबट्या हल्ला’ असा दोष दिला जातो. ही चूक थांबवणे गरजेचे आहे. बरेचसे हल्ले एआय जनरेटेड असतात. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवा धोकादायक आहेत. वाघ कधी कधी नजरेस पडतो; पण याचा अर्थ तो वस्तीवर हल्ला करणार, असा नसतो. वाघ दिसला की, लगेच व्हिडिओ-पोस्ट टाकून ‘वाघ आला आहे’ असे मेसेज व्हायरल केले जातात. हे अज्ञानामुळे पसरते आणि भीती निर्माण होते.
तीन नर वाघ, शिल्लक वाघिणींची गरज – सध्या प्रकल्पात तीन वाघ असून, त्यात एकही वाघीण नाही त्यामुळे हे वाघ वाघिणींच्या शोधात भटकत आहेत. त्यामुळे प्रजनन थांबले आहे. वाघांची संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील इतर भागांतून वाघिणी सह्याद्रीत आणण्याचे काम सुरू आहे. वाघिणींच्या आगमनानंतर त्यांचे आणि परिसरातील लोकांचे सुरक्षा प्रशिक्षण, मार्गदर्शन यासाठी विभागाकडून व्यापक योजना राबवण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाघांच्या स्थानांतरणाबाबत चव्हाण यांनी सांगितले, प्रत्येक वाघाला खास रेडिओ कॉलर लावले जाते. त्यावरून त्यांची हालचाल, कुठे जातात, कुठे थांबतात याची अचूक माहिती मिळते. यामुळे वाघ नवीन क्षेत्रात गेल्यास तेथील लोकांना सावधानता दिली जाते.
निसर्गप्रेमींसाठी मूल्यवान कार्यक्रम – ‘मुशाफिर जंगलवाटांचे’ या मालिकेत येत्या प्रत्येक महिन्यात नवनवीन जंगलप्रेमी, अधिकारी, अभ्यासक, फोटोग्राफर्स यांची अनुभवकथने चिपळूणकरांना ऐकायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाला विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनाधिकारी प्रियंका लगड, रामशेठ रेडीज, डॉ. तेजानंद गणपत्ये, भाऊ काटदरे यांच्यासह चिपळुणातील निसर्गप्रेमी उपस्थित होते.
