तालुक्यातील कुधें जिनेन्द्रनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कातळपरिसर असल्याने त्यावर उगवलेल्या गवताला लागलेला वणवा पसरून निकिता राजेंद्र रसाळ यांच्या गोदामात शिरला. यामध्ये गोदाम जळून खाक झाले असून, सुमारे २६ लाखांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी नगरपालिका व फिनोलेक्स कंपनीच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. गेले दोन-तीन दिवस जोरदार वारे वाहत आहेत. या वाऱ्याबरोबर वणवा वेगाने पसरला. कातळभागाजवळ गोदाम असलेल्या परिसरात हा वणवा सकाळी साडेअकराच्या सुमारास शिरला. त्यामुळे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. निकिता रसाळ यांचे पावसमध्ये हार्डवेअरचे दुकान आहे. त्या दुकानाचा माल या गोदामामध्ये असतो. इलेक्ट्रिक सामान, रंगाचे डबे, ताडपत्री, पाण्याच्या टाक्या, प्लास्टिकच्या अनेक प्रकारच्या वस्तू या गोदामामध्ये साठवण्यात आल्या होत्या.
त्या वाचवण्यासाठी रत्नागिरी पालिका व फिनोलेक्स कंपनीचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत स्थानिक ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते; मात्र आगीची तीव्रता मोठी असल्याने गोदाम जळून खाक झाले. यामध्ये वस्तूंचे सुमारे २६ लाख १७ हजार रुपयांचे नुकसान झाले. दोन तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. अजूनही आग धुमसत आहे. या संदर्भात मेर्वी तलाठी मीनाक्षी कदम यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी पोलिसपाटील, पोलिस अंमलदार, गोडाऊन मालक, विलास वारिशे, रविकिरण तोडणकर, राजेंद्र रसाळ आणि कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सहायक पोलिस निरीक्षक विक्रमसिंग पाटील, चालक निखिल साळवी या प्रसंगी उपस्थित होते.
