HomekonkanChiplunचिपळूणच्या बसस्थानकाच्या आराखड्यात मोठा बदल निधीअभावी स्लॅब रद्द

चिपळूणच्या बसस्थानकाच्या आराखड्यात मोठा बदल निधीअभावी स्लॅब रद्द

दुमजली इमारत व त्यामध्ये नियंत्रण कक्षासह हायटेक पद्धतीच्या सुविधा देण्यात येणार होत्या.

कोकणातील मध्यवर्ती ठिकाणी व चोवीस तास सेवा देणाऱ्या चिपळूण बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम निधीअभावी रखडले आहे. त्यातच आता या इमारतीच्या मूळ आराखड्यात बदल करत स्लॅबऐवजी पत्राशेड टाकण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याप्रमाणे आराखडा उपलब्ध होताच हे काम तातडीने हाती घेतले जाणार आहे. तोवर बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, लांजा या तीन प्रमुख बसस्थानकासह अन्य बसस्थानकांचे काम २०१८ पासून सुरू आहे. यातील रत्नागिरी बसस्थानकाचे काम पूर्णत्वास गेले तरी उर्वरित बसस्थानकाचे काम निधीअभावी तर कधी ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे हे काम रखडले. इमारतीच्या पायथ्याचे काम पूर्ण केल्यानंतर चार वर्षे अर्ध्यावरच काम रखडले होते. या कालावधीत बांधकाममधील लोखंड गंजल्याने मूळ बांधकामाला धोका निर्माण झाल्याची ओरड सुरू होती. अशातच पुन्हा हे काम सुरू केले. चिपळूणच्या हायटेक बसस्थानकाच्या कामासाठी सलग दोन ठेकेदार बदलल्यानंतर तिसऱ्या ठेकेदाराकडे हे काम देण्यात आले. त्यानेही पोटठेकेदाराकडे ही जबाबदारी सोपवल्यानंतर महिनाभरापूर्वी या कामाला पुन्हा जोमाने सुरवात झाली; मात्र आता या इमारतीच्या रचनेतच बदल करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

दुमजली इमारत व त्यामध्ये नियंत्रण कक्षासह हायटेक पद्धतीच्या सुविधा देण्यात येणार होत्या; मात्र आता दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब रद्द करून त्या ऐवजी पत्राशेड उभारण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या अभियंता विभागाने ठेवला आहे. या कामासाठी २०१६-१७च्या दरानुसार, सुमारे २ कोटी ९० लाखइतका निधी मंजूर आहे; मात्र आता दरवाढीमुळे या निधीत हे काम पूर्ण होणार नसल्याने व वाढीव निधीची मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने अखेर आराखड्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी उद्भवणारी पूरपरिस्थिती लक्षात घेऊन नव्या बसस्थानकाची रचना करण्यात आली होती तसेच चिपळूण बसस्थानकातून मोठ्या प्रमाणात फेऱ्या सोडल्या जातात. जिल्ह्यात इतर बसस्थानकाच्या तुलनेत २४ तास बससेवा येथे सुरू असते; मात्र आराखड्यातील बदलाच्या निर्णयामुळे प्रवाशांसह बसस्थानक यंत्रणेला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments