मिऱ्या शिरगाव ३४ गावांच्या प्रादेशिक नळपाणी योजनेचे काम निधी अभावी रखडले आहे. आतापर्यंत या योजनेचे काम ६५ टक्के झाले आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या, काँक्रिटची कामे थांबली आहेत. १३५ कोटींची ही योजना आहे. ४७ कोटींच्या कामाच्या रकमेची मागणी करण्यात आली आहे; परंतु फक्त १० कोटीच आल्यामुळे योजनेची तांत्रिक कामे, खोदाईची कामे सोडली तर इतर सर्व कामे जवळजवळ थांबली आहेत. काही गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारातून ही योजना मंजूर झाली. सातत्याने पाठपुरावा करून मिऱ्या-शिरगाव प्रादेशिक नळपाणी योजनेला १३५ कोटी मंजूर केले. या योजनेसाठी कोल्हापूर टाईप दोन बंधारेही बावनदीवर मंजूर करण्यात आले असून, त्यांची कामेही सुरू आहेत. तालुक्यातील महामार्गावरील गावांसह रत्नागिरी शहरालगतच्या गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे.
अनेक गावांमध्ये टाक्याही बांधण्याचे काम सुरू आहे. पाईपलाईनचे कामही झाले आहे. या प्रादेशिक नळपाणी योजनेचे ठेकेदाराकडून काम सुरू असून, झालेल्या कामासाठीचा ४७कोटींच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यापैकी १० कोटीच प्राप्त झाले आहेत. शासनाकडून निधी कमी येत असल्याने कामावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. काही ठिकाणी किरकोळ कामे सुरू आहेत. त्यामुळे टाक्यांची कामे व नळपाणी योजनेसाठी काही ठिकाणी काँक्रिट टाकावे लागत आहे. फक्त तांत्रिक कामे व खोदाईची कामेच ठेकेदाराकडून सुरू आहे.
पुढील २६ वर्षांचा विचार – रत्नागिरी तालुक्यातील ३४ गावातील २०४ वाड्यांची तहान भागवणाऱ्या मिऱ्या, शिरगाव, निवळी तिठा यांसह अन्य ३४ गावांच्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात या योजनेचे काम पूर्ण होणार आहे. पुढील २६ वर्षांतील सुमारे २ लाख लोकांचा विचार करून ही योजना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या गावांची तहान भागणार असून एमआयडीसीवरील पाणीपुरवठ्याचा भार कमी होणार आहे.
