मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण पंचायत समितीसमोर बनवण्यात आलेल्या सेवारस्त्यावर दिवसभर वाहने उभी करून ठेवलेली असतात. अशा प्रकारच्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीचा गोंधळ उडत आहे. सेवारस्ता वाहतुकीसाठी असताना तो आता पार्किंग झोन बनलेला असून, त्याकडे वाहतूक पोलिस डोळेझाक करत आहेत. महामार्गावर चिपळूण प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत उड्डाणपूल उभारला जात आहे. त्यापुढील रस्ता चौपदरीकरण करण्यात आला आहे. चिपळूण पंचायत समितीसमोर निम्मा रस्ता झाला असून, निम्म्या रस्त्याचे काम अजूनही सुरू आहे. या ठिकाणाहून तहसील कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय, ट्रेझरी आणि पंचायत समिती कार्यालयात जाण्यासाठी मुख्य मार्गालगत सेवारस्ता बनवण्यात आला आहे. पाग भागात राहणाऱ्या लोकांनाही हा रस्ता सोयीचा आहे; मात्र येथील शासकीय कार्यालयात जाण्यासाठी येणारे नागरिक रस्त्यावर आपले चारचाकी वाहन उभे करून निघून जातात. त्यामुळे सेवारस्त्याची एक बाजू चारचाकी वाहनांनी भरलेली असते.
एकावेळी किमान दोन वाहने ये-जा करतील इतक्या रुंदीचा सेवारस्ता बनवण्यात आला आहे; परंतु तिथे वाहने उभी केल्यानंतर रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी वापरता ‘येते. त्यामुळे दोन वाहने समोरासमोर आली तर वाहतूककोंडी होते. त्यातून वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडतात. या रस्त्यावर शाळेच्या बस किंवा मोठा टेम्पो आला तर वाहनचालकांना अधिक त्रास होतो. सेवारस्त्याची एक बाजू वाहनांनी भरल्यानंतर काही चालक महामार्गावरही वाहने उभी करून ठेवतात. त्यामुळे चिपळूण पंचायत समितीच्या समोरील अनधिकृत पार्किंग ही फक्त वाहतूक समस्या नव्हे तर प्रवाशांच्या निष्काळजीपणाचे उदाहरण बनलेले आहे. दरम्यान, प्रांताधिकारी कार्यालयासमोर भुयारी मार्ग काढण्यात आला आहे. या मार्गाच्या खाली चारचाकी मोठी वाहने उभी केली जातात. येथे रात्रीवेळी मोठ्या खासगी बस लावल्या जातात. दिवस-रात्र येथे चारचाकी आणि दुचाकी उभ्या केल्या जातात.
…म्हणून रस्त्यावर होते पार्किंग ! – चिपळूण पंचायत समितीच्या आवारात दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करण्यासाठी व्यवस्था आहे; मात्र दुचाकीवरून येणारे चालक फार कमी आहेत. शासकीय कर्मचारी आणि नागरिक मोठी वाहने घेऊनच येतात. त्यामुळे चिपळूण पंचायत समितीच्या आवारात वाहनांसाठी जागा शिल्लक राहत नाही, त्यामुळे वाहनचालक आपली वाहने रस्त्यावर उभी करत असल्याचे कारण पुढे आले आहे.
