समुद्र किनाऱ्यावरील स्टंटमुळे जीव धोक्यात येत असून, अनेकेवळा भरती ओहोटीचे वेळापत्रक माहिती नसल्याने अनेकेळा वाहने पाण्यात अडकली आहेत. तसेच किनाऱ्यावर वाहने चालवताना चालकांसह गाडीमधील प्रवाशांचाही जीव धोक्यात येत असतो. तसेच इतर पर्यटक, स्थानिक नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत आहे. वाढती गर्दी आणि संभाव्य अपघात लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. या मागणीची गंभीर दखल घेत दापोली पोलिसांनी तातडीने कारवाईचे सत्र सुरू केले आहे. स्टंटबाजी करणाऱ्या व निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी ताब्यात घेत दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
किनाऱ्यावर वाहनांचा प्रवेश रोखण्यासाठी प्रमुख प्रवेश मार्गांवर लोखंडी बॅरिकेडस् बसवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांवर नियंत्रण ठेवणे सोपे जात आहे. गर्दीच्या वेळी, विशेषतः सायंकाळच्या सुमारास मुरुड बीचवर पोलिसांचा कायमस्वरूपी बंदोबस्त तैनात केला आहे. दापोली पोलिसांच्या या कडक भूमिकेमुळे समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षित व शांत वातावरण निर्माण होऊ लागले असून या कारवाईचे स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
पर्यटकांना आवाहन – दरम्यान, दापोली पोलिस प्रशासनाने पर्यटकांना आवाहन केले आहे की, समुद्रकिनाऱ्यावर वाहने नेऊ नयेत, स्टंटबाजी व वेगवान वाहन चालविणे टाळावे. तसेच तालुक्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांची शांतता व स्वच्छता जपावी. नियमांचे उल्लंघन केल्यास यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
