टीडब्ल्यूजे’ या गुंतवणूक संस्थेचा संचालक राज्यातील शेकडो पोलिसांनी गुंतवणूक केल्याचा दावा करताना दिसणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, हा व्हिडीओ फार पूर्वीचा असून सध्या प्रसारित होत असलेला मजकूर दिशाभूल करणारा आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. तसेच संस्थेचा संचालक समीर नार्वेकर याच्या शोधासाठी चार जिल्ह्यांतील पोलीस यंत्रणा सक्रिय असून, लवकरच तो पोलिसांच्या तावडीत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हायटेक टीडब्ल्यूजे या संस्थेने चिपळूणमध्ये कार्यालय सुरू करून सुरुवातीला आकर्षक योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना भुलवले, कमी कालावधीत दामदुप्पट परतावा, विविध लाभांचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक गोळा करण्यात आली. प्रारंभी काही गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे परतावाही देण्यात आल्याने अल्पावधीतच टीडब्ल्यूजेची चिपळूणमध्ये लोकप्रियता वाढली. मात्र, त्यानंतर अचानक लाभ देण्यात दिरंगाई होऊ लागली, संचालक संपर्काबाहेर राहू लागल्याने गुंतवणूकदारांना फसवणुकीची जाणीव झाली आणि पोलीस ठाण्यात तक्रारींचा ओघ सरू झाला. काही दिवसांपूर्वी संतृप्त गुंतवणूकदारांनी चिपळूण पोलीस ठाण्यावर धडक देत तीन संताप व्यक्त केला.
