मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोलीतील तापमान सलग दहा दिवस सात अंशाच्या खाली किंवा आसपास राहिल्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा आहे. जिल्ह्यातही थंड वातावरण असून पर्यटन स्थळांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. या वातावरणाचा फायदा हापूस आंब्याला झाला असून, कलमांना मोठ्याप्रमाणात मोहोर आलेला आहे. पुढील पंधरा दिवसांत सेटिंग होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, यंदाचा हापूसचा हंगाम सर्वसाधारण ५० दिवसांचाच राहील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात २० ते २४ डिसेंबर या कालावधीत कमाल तापमान ३२-३४ अंश सेल्सिअस दरम्यान आणि किमान तापमान १८-२२ अंश सेल्सिअस सरासरी तापमान राहण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील वातावरण थंडा थंडा कुल कुल असेच आहे. दुपारी पारा ३१ ते ३२ अंशापर्यंत असतो. त्यामुळे हवेत उष्मा जाणवतो; परंतु सायंकाळनंतर हवेत गारवा पसरतो. उत्तरेकडून गार वारे वाहत असल्यामुळे यंदा दापोलीत सर्वाधिक काळ पारा ७ अंशाच्या दरम्यान राहिलेला आहे. १९ डिसेंबर रोजी दापोलीत ६.९ अंश सेल्सिअस इतका राहिला आहे. तेथील कमाल तापमान ३२ अंश आहे. किमान तापमान सलग दहा दिवस कमी राहिल्यामुळे दापोलीत पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे.
कर्दे, मुरूड, हर्णै या प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. त्याचा फायदा स्थानिक व्यावसायिकांना होत आहे. तापमानातील बदलाचे परिणाम हापूसवर होतात. सध्या थंडी पडल्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य बागांमधील कलमे मोहोरांनी फुललेली आहेत. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले मिळेल बागायतदारांमध्ये झालेली आहे. मात्र पुढील कालावधीत वातावरणाची साथ मिळणे गरजेचे आहे, असे बागायतदारांचे मत आहे. मोहोरावर किडरोगांचा प्रादुर्भाव झाला नाही, तर एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात पीक मोठ्याप्रमाणात येईल अशी शक्यता आहे. यंदा पाऊस लांबल्यामुळे एक महिना हंगाम लांबलेला आहे. त्यामुळे मार्च महिन्यातील पीक अत्यंत कमी राहणार आहे. एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून उत्पादन हाती येण्यास सुरुवात होईल. सध्याच्या परिस्थितीमुळे यंदा हंगामातील कालावधीत जास्तीत जास्त ५० दिवसांचाच राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गेले काही दिवस मोहोरावर तुडतुडा मोठ्याप्रमाणात येऊ लागल्यामुळे औषध फवारणीसाठी बागायतदारांची कसरत सुरू झाली आहे.
