चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाची फसवणूक केली नाही. शिवसेना भाजप युतीने निवडणुकीला सामोरे गेलो आणि एकहाती यश मिळाले. नगराध्यक्षपदी युतीचे उमेश सकपाळ मोठ्या फरकाने विजयी झाले. आता हाच पॅटर्न आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राबवला जाईल, असे सांगत महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला दरवाजे बंद असल्याचे स्पष्ट संकेत पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळुणातील युतीच्या मेळाव्यात दिले. चिपळूण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना भाजप युतीने १६ जागा जिंकत सत्ता काबीज केली. या पार्श्वभूमीवर युतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी अतिथी सभागृहात करण्यात आला. या वेळी पालकमंत्री सामंत म्हणाले, “जिल्ह्यात महायुतीला मोठे यश मिळाले. राजापुरात थोड्याशा फरकाने जागा गेल्या; परंतु तेथे गतवेळच्या तुलनेत नगरसेवकांची संख्या वाढली आहे.
उर्वरित रत्नागिरी, लांजा, देवरूख, चिपळूण, गुहागर आणि खेडमध्ये युतीला मोठे यश मिळाले. चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षासोबत युती व्हावी, अशी आमचीही इच्छा होती; मात्र ते ठरावीक जागांवर अडून बसल्याने महायुती झाली नाही. शिवसेना भाजप युतीला या निवडणुकीत चांगले यश मिळाले. त्यामुळे हाच पॅटर्न आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राबवला जाईल. जिल्ह्यातील महायुतीबाबत आपण योग्य निर्णय घेऊ. रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार दिले तरी त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. चिपळुणात पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा जाहीरपणे दिलाच आहे. आता त्यांना महायुतीचे दरवाजे बंद असतील.”नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनीही भावना व्यक्त करत शहर विकासाला गती देण्याचे आश्वासन दिले. चिपळूण पालिकेच्या नवीन इमारतीसाठी महिन्यात निधी मंजूर करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
