कुष्ठरोग शोध मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात मिळून एकूण १४ लाख ९३ हजार ५४८ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये ८ हजार ४४४ संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी अंतिम निदान झालेले २२ कुष्ठरुग्ण असून, त्यांच्यावर बहुविध औषधोपचार सुरु करण्यात आले आहेत, अशी माहिती प्रभारी सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. परवेज पटेल यांनी दिली आहे. खेड, संगमेश्वर, गुहागर या तीन तालुक्यात एकही रुग्ण सापडलेला नाही. जिल्ह्यातील कुष्ठरोग्यांची संख्या २०२७ पर्यंत शून्यावर आणण्यासाठी अर्थात शून्य कुष्ठरोग प्रसार हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात आले. या अभियानात आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवक यांच्यामार्फत घरोघरी जाऊन तपासणी केली. आरोग्य विभागाकडून ही मोहीम यशस्वी करण्यात आली आहे.
याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी मोहिमेत काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. मोहीम जरी संपली असली तरीही ही तपासणी सर्व आरोग्य केंद्रात वर्षभर सुरू असणार आहे. त्यामुळे त्वचेवर फिकट किंवा लालसर, बधीर, संवेदनाहीन एक किंवा अनेक चट्टे असणे, त्वचा तेलकट किंवा गाठीदार होणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, तळहात व तळपायावर मुंग्या येणे, हात व पायाची बोटे वाकडी होणे अशी लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. आठल्ये यांनी केले आहे.
