चिपळूण पालिका निवडणुकीत पराभवास सामोरे गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मैदान मारण्यासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा देत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित केले आहेत. अंतर्गत कलह टाळण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या सर्वानुमते उमेदवार ठरवले. अनुभवींना संधी देतानाच काही ठिकाणी नवे चेहरे देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मोठी निराशा झाली. नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडणुकीत दिला नसला तरी राष्ट्रवादीचे केवळ दोन उमेदवार विजयी झाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही केवळ दोनच जागा मिळाल्या. तुलनेत शिवसेना-भाजप युतीने मुसंडी मारत पालिकेत प्रथमच एकहाती सत्ता मिळवली. भाजपनेते प्रशांत यादव यांनी योग्य नियोजन करत वर्चस्व राखले. दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत फसगत होऊ नये यासाठी आमदार शेखर निकम जोमाने कामाला लागले आहेत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेत जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवार निश्चित केले.
तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गटात ७ जागा या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. केवळ दोन प्रभाग सर्वसाधारण राहिले आहेत. त्यामुळे कोकरे आणि उमरोली गटात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. पंचायत समितीच्या १८ गणांत ही निवडणूक होणार आहे. तालुक्यातील कुटरे, गुढे हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, अलोरे व मांडकी नागरिकांचा मागास प्रवर्ग, तर भोम, कोकरे, निवळी, कळवंडे, चिंचघरी, पिंपळी, शिरगांव, दळवटणे गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. तसेच पेढे, खेर्डी, वेहेळे, सावर्डे, उमरोली, वहाळ गण सर्वसाधारण प्रवर्गात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, युवक तालुकाध्यक्ष नीलेश कदम, माजी सभापती सुरेश खापले, विजय गुजर हे पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळण्यात दावेदार मानले जात आहेत. ग्रामीण भागात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. गत विधानसभा निवडणुकीत आमदार शेखर निकम यांना केलेल्या विकास कामांच्या तुलनेत अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. याउलट चिपळूण तालुक्यातून ते पिछाडीवर राहिले.
कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना – पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाचा वरचष्मा राहण्यासाठी आमदार निकम जोमाने कामाला लागले आहेत. बहुतांशी गणातील उमेदवार निश्चित करून त्यांना प्रचार करण्याच्याही सूचना दिल्या असल्याचे समजते.
