HomekonkanChiplunकेट आय लावण्याचे काम मनसेने बंद पाडले चिपळूण-पाटण मार्ग

केट आय लावण्याचे काम मनसेने बंद पाडले चिपळूण-पाटण मार्ग

या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, किरकोळ व गंभीर अपघात घडले आहेत.

चिपळूण-पाटण हा घाटमाथ्यावर जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असून, सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. रस्ता खड्यांनी भरलेला असताना ते खड्डे न बुजवता महामार्गाच्या साईटपट्टीला कॅट आय बसवण्याचे काम सुरू आहे. याला मनसेने तीव्र आक्षेप घेतला आहे. मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी पिंपळी येथे हे काम थांबवत प्रथम खड्डे भरा नंतर इतर कामे करा; अन्यथा सरळ फटके देऊन वठणीवर आणू, असा आक्रमक इशारा महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. मनसेच्या या पवित्र्यामुळे परजिल्ह्यातील ठेकेदाराने अखेर काम बंद केले. चिपळूण-पाटण रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ताब्यात आला आहे; मात्र ताबा घेतल्यानंतर महामार्ग विभागाने रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करत आपल्याला सोयीस्कर अशी कामे सुरू केल्याचा आरोप मनसेने केला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी पहिलाच दणका देत संबंधित कामाला विरोध केला. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, किरकोळ व गंभीर अपघात घडले आहेत.

विशेषतः अनेक जीव घेणाऱ्या पिंपळी पुलाजवळ कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. खड्डे बुजवण्याबाबत वारंवार मागणी करूनही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोपही केला आहे. पुणे येथील एका ठेकेदाराकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कॅट आय लावण्याचे काम सुरू होते. मात्र, प्रत्यक्षात खरी आणि तातडीची गरज खड्डे बुजवण्याची असताना हे काम केवळ ठेकेदारांच्या हितासाठी करण्यात येत असल्याचा आरोप करत मनसेचे राजू खेतले आणि मनसैनिकांनी हे काम रोखले. प्रथम खड्डे बुजवा, रस्ता सुस्थितीत करा त्यानंतर इतर कामे करा. नको त्या कामांना परवानगी दिली जाणार नाही. खड्डे न बुजवता कॅट आय बसवले, तर ठेकेदाराला फटके दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments