जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांमध्ये विविध कारवायांमध्ये १८१ किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गत जिल्हा पोलिसांनी जप्त केलेल्या अमली पदार्थ विल्हेवाट लावण्यात आली. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी येथील ‘महाराष्ट्र एनविरो पॉवर लिमिटेड’ मध्ये ‘इन्सिनरेशन’ (भस्मीकरण) पद्धतीने हा साठा नष्ट करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या अध्यक्षतेखालील अमली पदार्थ विल्हेवाट समितीने ही कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार आणि एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत जप्त करण्यात आलेल्या मालाचा नाश करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. यामध्ये २०२० ते २०२५ या कालावधीत दाखल झालेल्या एकूण ६५ गुन्ह्यांचा समावेश होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी न्यायालयाकडून रीतसर परवानगी मिळवून आणि महाराष्ट्र प्रक्षण नियंत्रण मंडळाची मंजुरी घेऊन ही कारवाई पूर्ण केली.
आज दुपारी पुणे रांजणगाव येथे सुरक्षितरीत्या नेऊन जाळण्यात आला. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्थेत पार पडली. यावेळी अमली पदार्थ विल्हेवाट समितीचे अध्यक्ष तथा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, सदस्य अपर पोलिस अधीक्षक व्ही. व्ही. महामुनी आणि पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) राधिका फडके यांची प्रमुख उपस्थिती होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. अमली पदार्थमुक्त समाज घडवण्यासाठी रत्नागिरी पोलिसदल कटिबद्ध असल्याचे या वेळी पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
