HomeRatnagiriशिवसृष्टीकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण, प्रशासनाचे दुर्लक्ष

शिवसृष्टीकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण, प्रशासनाचे दुर्लक्ष

अनेक पर्यटकांनी या दुरवस्थेबद्दल थेट नाराजी व्यक्त केली आहे.

रत्नागिरीतील पर्यटनाला नवी झळाळी देण्यासाठी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी भव्य शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचे दर्शन घडविणाऱ्या या प्रकल्पाने अल्पावधीतच राज्यभरातील पर्यटकांना आकर्षित केले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक शिवसृष्टी पाहायला जात आहेत; मात्र पर्यटकांना रत्नागिरी शहर ते शिवसृष्टी या मार्गावरील खराब रस्त्याचे धक्के सहन करावे लागत आहेत. रत्नागिरी शहरातून शिवसृष्टीकडे जाणाऱ्या मार्गावर सध्या प्रचंड खड्डे पडलेले असून, रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. या मार्गावरून गाडी चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबर पूर्णपणे उखडून गेल्यामुळे केवळ खडी आणि माती उरलेली आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकार वाढलेले आहेत. शिवसृष्टी पाहण्यासाठी येणारे पर्यटक मोठ्या उत्साहाने येतात; परंतु या मार्गावरील खड्यांमुळे त्यांचा प्रवासाचा आनंद पूर्णपणे विरून जात आहे.

अनेक पर्यटकांनी या दुरवस्थेबद्दल थेट नाराजी व्यक्त केली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभा केला जात असताना साध्या रस्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न पर्यटक उपस्थित करत आहेत. याबाबत परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांनी सांगितले की, शिवसृष्टी हा प्रकल्प अतिशय देखणा आणि प्रेरणादायी आहे; परंतु तिथे पोहोचणारा रस्ता यातना देणारा आहे.  खराब रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहेच शिवाय वाहतूककोंडीचाही सामना करावा लागतो. हा प्रकल्प उभारण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे पर्यटकांचा ओघ रत्नदुर्ग किल्ला आणि शिवसृष्टी दोन्हीकडे वाढलेला आहे. या प्रकल्पाकडे जाणारा रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

खड्ड्यांचे ग्रहण – स्थानिक नागरिकांनीही किल्ल्याकडे जाणाऱ्या समस्येबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत; मात्र संबंधित विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे पाठ फिरविली आहे. शिवसृष्टीच्या सौंदर्याला खड्ड्यांचे ग्रहण लागले असून, पर्यटकांची वाढती नाराजी पाहता प्रशासनाने युद्धपातळीवर या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments