मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे काही पर्यटक वाहने संगमेश्वर-डिंगणी येथून गणपतीपुळेकडे घेऊन जातात. मात्र, या मार्गावर असलेल्या गॅसपंपाच्या ठिकाणी गॅस भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांच्या रांगांचा अडथळा वाहतुकीला होत आहे. या रांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होते. हा रस्ता अरुंद असल्यामुळे तेथून वाहने चालवणे अशक्य होत आहे. डिंगणी रस्त्यावरून गॅसची वाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्याही रस्त्याच्या कडेला तासन्तास उभ्या करून ठेवल्या जातात. आधीच हा रस्ता अरुंद असून, त्यात अनेक ठिकाणी वळणे आहेत. अशा परिस्थितीत रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे समोरून येणारी वाहने किंवा वळणावरील रस्ता स्पष्ट दिसत नाही. त्यामधून अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. रविवारी (ता. २८) सायंकाळी याच कारणामुळे या मार्गावर वाहतूककोंडी झाली होती.
गॅस भरण्यासाठी उभ्या असलेल्या वाहनांमुळे एसटी बसेस, तसेच अन्य खासगी वाहने कोंडीत अडकून पडली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे काही काळासाठी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. या ठिकाणी इंधन भरण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याची गरज असून, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. काही वेळा वाहनचालकांमध्येही वादावादी होत असतात. सातत्याने उद्भवणाऱ्या समस्यांबाबत अनेक वेळा वाहनचालक व नागरिकांनी याबाबत संबंधितांकडे तक्रार केलेली होती; परंतु कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. या बाबीकडे पोलिस, स्थानिक प्रशासन व संबंधित विभागांनी तातडीने लक्ष देऊन योग्य पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी केली आहे.
