Homekhedkhedएमआयडीसीने ग्रामीण अर्थकारणाला 'बूस्टर'

एमआयडीसीने ग्रामीण अर्थकारणाला ‘बूस्टर’

कंपन्यांमधून ३५ हजार लोकांना रोजगार निर्माण झालेला आहे.

लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीच्या निर्मितीनंतर गेल्या काही वर्षांत आजुबाजूच्या गावातील लोकांना जोड व्यवसायांमुळे उत्पन्नाचे साधन निर्माण झालेले आहे. परजिल्ह्यातून किंवा अन्य तालुक्यांतून कंपन्यांमध्ये नोकरीसाठी आलेल्या लोकांच्या निवास व्यवस्थेतूनही आर्थिक स्त्रोत निर्माण झालेले आहेत. येथील कंपन्यांमधून ३५ हजार लोकांना रोजगार निर्माण झालेला आहे. लोटे-परशुराम परिसरात १९८३ मध्ये अडीच हजार एकर क्षेत्रावर पहिली औद्योगिक वसाहत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उभी राहिली. त्यानंतर अतिरिक्त लोटे एमआयडीसीसाठी सुमारे सहाशे एकर जमीन एमआयडीसीने संपादित केली. दोन्ही औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून विविध कंपन्या आहेत. त्यामुळे लोटे परिसरामध्ये मोठे स्थित्यंतर झाले. त्यामुळे आजूबाजुच्या गावातील परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली. औद्योगिक वसाहतीत बहुराष्ट्रीय तसेच स्थानिक राज्यातील, विविध कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे स्थानिक कामगारांना रोजगार उपलब्ध झाला. परजिल्ह्यातील लोकं येथे आल्यामुळे गृह प्रकल्पांची संख्या वेगाने वाढली. ती अजूनही वाढतच आहे. येथील शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या सधन बनला आहे.

लोटे व परिसरातील गावात सुमारे ५०० हून अधिक भाड्याच्या खोल्यांची संख्या आहे. भाड्याच्या खोल्या कामगार वर्गासाठी बांधायच्या आणि त्यातून उत्पन्न मिळवायचे हा फंडा अनेकांनी अवलंबला आहे. त्यामुळे प्रत्येक गावात भाड्याच्या खोल्या, भाड्याच्या चाळी, काही भाड्याच्या खोल्यांचे अद्ययावत प्रकल्प येथे पाहावयास मिळतात. एका खोलीला एक हजार, दोन हजार रुपयांपासून पाच हजार रुपये भाडे काहीजण आकारतात. एका लोटे गावात खोल्यांची संख्या २५० पेक्षा जास्त आहे. त्यातून मालकांना चांगले उत्पन्न मिळत आहे. लोटे परिसरात कारखाने उभे राहिल्यानंतर अनेक जोडधंदे सुरू झाले. उपाहारगृह, हॉटेल, किराणा शॉपी, सुपर मार्केट व इतर व्यवसाय सुरू केले. वाळू, डबर (दगड) विटा, मुरूम, माती, पाणी कंपन्या विकत घेऊ लागल्या. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील मोठ्या कारखानदारांनी अनेक गावांना दत्त घेतले आहेत. या गावांमध्ये सीएसआरच्या माध्यमातून रस्ते, पाणीटंचाई, दिवाबत्ती शाळांची दुरुस्ती आणि विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी यासाठी उपक्रम राबवले जातात.

ग्रामपंचायतीला मिळतेय उत्पन्न – लोटे व परिसरातील गावे बदलली आहेत. या गावातील ग्रामपंचायती ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. ग्रामपंचायतीचे उत्पन्नही कोट्यवधी रुपयांचे झाले आहे. लोटे ग्रामपंचायतीला १३५ कंपन्या वर्षाला १ कोटी ७लाखाचा कर भरतात. इतर गावच्या ग्रामपंचायतीची उलाढाल ही कोटीत आहे.

गावांमध्ये उभी राहिली एमआयडीसी – धमाणदेवी, घणेखुंट, आवाशी, परशुराम, पटवर्धन लोटे, पिरलोटे
एमआयडीसीचे क्षेत्र : सुमारे अडीच हजार एकर
भूखंड : ६५०
चालू कारखाने : २९०
एमआयडीसीची वार्षिक उलाढाल : सुमारे १५००० कोटी
कामगारांची संख्या : सुमारे ३५०००

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments