शहरातील एमआयडीसी येथील एका शोरुमसमोर पैशाच्या देण्याघेण्यावरून हाणामारी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध परस्परविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुज्जमील अजिज पडवेकर (रा. धनजीनाका, बैलबाग, रत्नागिरी), ऋतीक चंद्रकांत वेदरे (करबुडे, वेदरेवाडी, रत्नागिरी) व सुहेल शौकत याहू (२८), शौद शौकत याहू (दोघेही रा. सना अपार्टमेंट, जेल रोड, रत्नागिरी), करीम तांबोळी (२७, रा. शिरगाव, रत्नागिरी) अशी हाणामारी करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (ता. ३०) दुपारी तीन ते पाच या वेळात एमआयडीसी येथील एका शोरुमसमोर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुहेल याहू याने फिर्यादीत म्हटले आहे, संशयित मुज्जमील पडवेकर व ऋतीक वेदरे यांचे कामगार विनोद मल्लाप्पा मुदकवी याचा संशयित ऋतिक वेदरे याच्याशी पैश्याच्या देण्याघेण्यावरून वाद झाला. फिर्यादी सुहेल यांनी वाद मिटविला. फिर्यादी तिथून निघून जात असताना विनोद मुदकवी यांचा संशयितांनी शोरुमपर्यंत पाठलाग करून मारहाण केली.
फिर्यादी व त्याच्यासोबत असलेले करिम तांबोळी त्याला सोडवत असताना फिर्यादीचा भाऊ शौद हा भांडण सोडविण्यास गेला असताना संशयित मुज्जमील पडवेकर याने स्टीलच्या रॉडने फिर्यादीचा भाऊ शौद याहू याच्या डोक्यात मारला. करीम तांबोळी यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. मुज्जमील अजीज पडवेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, फिर्यादीचा मित्र ऋतिक वेदरे व विनोद मुदकवी यांचा पैश्याचे देण्याघेण्यावरून वाद झाला. यावरून संशयित सुहेल याहू व शौद शौकत याहू यांनी फिर्यादी पडवेकर यांचा मित्र ऋतिक वेदरे याला स्टीलच्या रॉडने मारहाण करून शिवागाळ केली, तसेच ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी सुहेल याहू व मुज्जमील पडवेकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी पाच संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमलदार करत आहेत.
