रखडलेले रस्त्याचे काँक्रीटीकरण, मोकाट गुरांसह मोकाट कुत्र्यांचा त्रास, पर्यटनाला चालना देणारे उपक्रम, वाहतूक कोंडी, अखंडित पाणीपुरवठा हे प्रश्न सोडवण्यासह नावीन्यपूर्ण उपक्रम कोणते राबविणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सोमवारी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी शहराचे नेतृत्व स्वीकारले आहे. रत्नागिरी शहरातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणीपुरवठा होय. नव्या नळपाणी योजनेची अंमलबजावणी सुरू असली तरीही तांत्रिक अडचणी, जुन्या पाइपलाइन फुटण्याच्या घटना आणि काही भागात होणारा अनियमित पुरवठा यामुळे नागरिक त्रस्त आहेत. ही समस्या सोडवून रत्नागिरीला नियोजनबद्ध आणि स्थिर पाणीपुरवठा मिळवून देणे हे पहिले मोठे काम असेल. रत्नागिरी शहरातील स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारा कचरा हाताळण्यात नगरपालिका अडथळ्यांना सामोरे जात आहे. विशेषतः मच्छीमार्केट, आठवडा बाजार आणि जुन्या वस्तीतील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी यंत्रणा मजबूत करणे, नवीन कचरा वाहतूक गाड्या वाढवणे आणि सफाई कर्मचाऱ्यांची संख्या भरती करणे ही तातडीची गरज बनली आहे.
त्यासोबतच मोकाट जनावरे आणि रस्त्यावर वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येमुळे निर्माण होणारा नागरिकांतील असुरक्षिततेचा भाव दूर करण्यासाठीही तत्काळ उपाययोजना अपेक्षित आहेत. शहराच्या अर्थकारणाचा विचार केल्यास, नगरपालिकेवर सुमारे ३० ते ३५ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सांगितले जाते. केवळ शासनाच्या अनुदानावर अवलंबून न राहता कर आकारणीची प्रक्रिया सुधारणे, महसूल वाढवणे आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे या दिशेने पावले उचलावी लागतील. रत्नागिरी पर्यटनाच्यादृष्टीने जलदगतीने पुढे जात असताना शहराचे सौंदर्याकरण, पार्किंग व्यवस्थेत सुधारणा आणि सुसूत्र वाहतूक व्यवस्था यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. रत्नागिरी शहराचा विकास मार्गी लावण्याची जबाबदारी महायुतीचे नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यावरच आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होऊन विकासाला नवी गती मिळेल, अशी आशा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
