जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत कचरा संकलन आणि विलगीकरण केंद्र तयार करण्यात येत आहेत. या कचरा संकलन आणि विलगीकरण केंद्रांसाठी जिल्ह्यातील ६३४ ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये जागाही उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये कचरा संकलन आणि विलगीकरण केंद्राची कामेही सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक भागात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गावागावांत दिसणारे कचऱ्याचे ढीग हे स्थानिक प्रशासनासमोर डोकेदुखी ठरले आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कचरा संकलन आणि विलगीकरण केंद्र नसल्याने कोठेही रस्त्यात कचरा टाकण्याची वृत्ती वाढीला लागली आहे. त्यामुळे परिसराचे विद्रुपीकरण होऊन दुर्गंधीची समस्या निर्माण होत आहे.
कचऱ्याची ही समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यात कचरा संकलन आणि विलगीकरण केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायती असून त्यापैकी ६३४ ग्रामपंचायतींना कचरा संकलन आणि विलगीकरण केंद्रांसाठी जागा उपलब्ध झाली आहे. अजूनही २१२ ग्रामपंचायतीचा कचरा संकलन आणि विलगीकरण केंद्रासाठी जागेच्या शोधात आहेत. जिल्ह्यातील ८५ ग्रामपंचायतीमध्ये कचरा संकलन आणि विलगीकरण केंद्राची कामे पूर्ण झाली आहेत. स्या १२८ ग्रामपंचायतींच्या हद्दीत कचरा संकलन केंद्र व विलगीकरण केंद्राचे कामे सुरु करण्यात आली आहेत.
कचरा व्यवस्थापनाचे स्वरूप – घनकचरा विलगीकरणासाठी (ओला-सुका) वेगवेगळे कचरा कुंड्या वापरणे आणि कुजणारा कचरा खत म्हणून वापरणे यावर भर देण्यात येत आहे. यामध्ये ओला कचरा हा कंपोस्ट खत बनविण्यासाठी वापरला जातो. सुका कचरा म्हणजेच कागद, प्लास्टिक, काच इत्यादी प्रकारानुसार वेगवेगळे करुन पुनर्वापरासाठी विकले जातात. ज्यामुळे ग्रामपंचायतींना उत्पन्न मिळणार आहे.
