येत्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढविणार असल्याची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी येथे केली. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विश्वासात न घेतल्याचा अनुभव आल्याने आता स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही स्वबळावर निवडणूक लढविण्याची आग्रही मागणी केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद मजबूत असून, कार्यकर्त्यांच्या जोरावर आगामी निवडणुकांत चांगले यश मिळवू, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. स्वबळाच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रत्नागिरी जिल्ह्यात स्वतंत्र राजकीय ताकद दाखवून देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
खेड तालुक्यातील भडगाव-खोंडे जिल्हा परिषद गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा खेड शहरातील तटकरे सभागृहात झाला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार शेखर निकम, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे, तालुकाध्यक्ष संजय जाधव, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सखाराम कदम, उमेश देवरूखकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय बिरवटकर यांनी ज्या पद्धतीने स्वतःच्या ताकदीवर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जिंकण्याचा चंग बांधला आहे, त्याच पद्धतीने जिल्ह्यात सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी केले.
वाघ म्हणूनच पक्षाचे काम करू – वाघ म्हटला तरी खातो, वाघोबा म्हटला तरी खातो त्यामुळे यापुढे आम्हाला जर कोण विश्वासात घेणारच नसेल तर आम्ही वाघ म्हणूनच पक्षाचे काम करू, असे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी सांगितले.
