मिरजोळे जि. प. गटात शिवसेना ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. पक्षातील ३ सक्रीय पदाधिकाऱ्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्यासोबत, अजून १० ते १५ जण कार्यकर्ते शिंदे जाणार असल्याचे खात्रीशीर सांगितले जात आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यभर रंगल्या असून, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून जोरदार डावपेच केले जात आहेत. स्थानिक पातळीवर उमेदवार मि ळण्यासाठी प्रत्येकजण झगडत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची निवडणूकही तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील मिरजोळे जि. प. गटात शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
मिरजोळे जि.प. गटाचे विभागप्रमुख वैभव पाटील, उपविभागप्रमुख डॉ. मयुरेश पाटील, विभाग संघटक शुभानंद पाटील यांनी ठाकरे शिवसेनेतील पदांचा राजीनामा दिला आहे. सद्यस्थितीत पक्षाचे काम करणे शक्य होत नसल्याने वैयक्तिक कारणाने आपण पदाचा राजीनामा देत आहोत, असे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. अचानक ३ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. या तीनही पदाधिकारी अनेक कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहेत.
