कोकण रेल्वेच्या विकासाला नवी गती…

रुळांचे अद्ययावतीकरण, बोगद्यांची रुंदी वाढविणे व दुहेरीकरण करण्याचा प्रस्ताव आहे.

Must read

कोकण रेल्वे मार्गाची प्रवासी व माल वाहतूक क्षमता वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला आहे. तो सध्या मंजुरीच्या प्रक्रियेत असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच दिली आहे. त्यात रेल्वे रुळांचे अद्ययावतीकरण, काही बोगद्यांची रुंदी वाढविणे, तसेच निवडक टप्प्यांमध्ये दुहेरीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर कोकण रेल्वेच्या पायाभूत सुधारणा कामांना गती दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय अर्थसंकल्पात गोव्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली. कोकण रेल्वेमार्गाच्या बळकटीकरणासाठी ही तरतूद पूरक ठरणार आहे. कोकण रेल्वेमार्ग हा पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचा दळणवळण दुवा असून, प्रवासी वाहतुकीसह माल वाहतुकीसाठीही त्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. प्रस्तावित सुधारणा पूर्ण झाल्यास कोकण पट्ट्यातील पर्यटन, व्यापार आणि आर्थिक हालचालींना चालना मिळेल, असा विश्वास रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला. कोकण रेल्वे स्वतंत्र महामंडळ आहे. यामुळे महामंडळाने स्वतःच्या उत्पन्नातून येथील विविध प्रकल्प राबवावे, असे संकेत होते. यामुळे थेट बजेटमधून या महामंडळाला निधी मिळत नसे.

प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतुकीतून रेल्वेला फायदा अधिक मिळतो; मात्र कोकण रेल्वेची भौगोलिक स्थिती लक्षात घेता मालवाहतुकीला मर्यादा होत्या. साहजिकच महामंडळ नवनवे कल्पक प्रकल्प, विविध आव्हानात्मक कामांचे ठेके मिळवून होणाऱ्या नफ्यातून कोकण रेल्वेच्या विस्तारासाठी प्रयत्न करत असे. अर्थात याला मर्यादा होत्या. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्यानंतर केंद्राकडून विविध मार्गानी महामंडळाला निधी येऊ लागला. यातून विद्युतीकरणासह विविध स्थानकांच्या विकासात भर पडली. काही नवी स्थानके तयार करण्यात आली. वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी पाऊल टाकले गेले. आता कोकण रेल्वेच्या विकासाचा पुढचा टप्पा सुरू होण्याचे संकेत रेल्वेमंत्री वैष्णव यांनी नुकतेच दिले आहेत. हा मार्ग एकेरी आहे. याच्या क्षमता वाढीसाठी दुपदरीकरणाची गरज आहे.

शिवाय दऱ्याखोऱ्यांतून हा मार्ग असल्याने सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे. येथील स्थानकांच्या विकासाचीही गरज आहे. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी अर्थसंकल्पानंतर केलेले भाष्य सूचक आहे. त्यांच्या वक्तव्यानुसार, “कोकण रेल्वेच्या क्षमतेच्या वाढीसाठीचा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात आहे. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी तीन हजार २४४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय कोकण रेल्वेच्या सुरक्षेसाठी “कवच” प्रणाली बसवण्यावर भर दिला जाणार आहे. महत्त्वाच्या स्थानकांचा कायापालट केला जाईल.”

काय बदल होणार : कोकण रेल्वेच्या २६३ किलोमीटरच्या क्षेत्रात दुपदरीकरणासाठी सविस्तर प्रस्ताव गेला असून, तो मंजुरीच्या टप्प्यात. रोहा ते वीर दरम्यान दुपदरीकरण पूर्ण असून पुढील मार्गावर गती येण्याची आशा. वैभववाडी-कोल्हापूर मार्गामुळे कोकणातील बंदरे व पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठा जोडल्या जाणार. कोकण रेल्वेच्या सुरक्षेसाठी कवच ही स्वदेशी सुरक्षाप्रणाली बसविण्यावर भर. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत या मार्गावरील चार प्रमुख स्थानकांचे आधुनिकीकरण

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article