आपल्या जबरदस्त विनोदी टायमिंगने आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी ईशा डे आता नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात करत विवाहबंधनात अडकली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली ईशाने प्रसिद्ध गीतकार आणि लेखक अभिषेक खणकर याच्याशी लग्नगाठ बांधत आपल्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ईशाच्या लग्नाची उत्सुकता पाहायला मिळत होती. अखेर बुधवारी (१३ मार्च) या जोडीने पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने विवाह करत एकमेकांच्या साथीने नव्या प्रवासाला सुरुवात केली.
पारंपरिक लुकने वेधले सर्वांचे लक्ष
ईशा आणि अभिषेकच्या लग्नसोहळ्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ईशाच्या सहकलाकारांनीही लग्नातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले.
लग्नासाठी ईशाने लाल रंगाची आकर्षक नऊवारी साडी परिधान केली होती. पारंपरिक दागिने, खास नथ आणि सुंदर मंगळसूत्रामुळे तिचा लुक अधिकच उठून दिसत होता. तर अभिषेकने मेंदी रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान करून एक परफेक्ट महाराष्ट्रीयन वराचा लुक साकारला होता.
एका भावुक क्षणात अभिषेक इशाला मंगळसूत्र घालताना दिसत आहे, आणि हा क्षण पाहून चाहत्यांनाही आनंदाचा अनुभव आला.
कोण आहे अभिषेक खणकर?
ईशाचा जीवनसाथी अभिषेक खणकर हा मराठी सिनेसृष्टीतील प्रतिभावान गीतकार आणि लेखक म्हणून ओळखला जातो. अनेक लोकप्रिय मालिकांची शीर्षकगीते त्याने लिहिली आहेत. तसेच अनेक मराठी चित्रपटांसाठीही त्याने गाणी लिहून आपल्या लेखनकौशल्याची छाप उमटवली आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वीच ईशाने केळवण आणि मेंदी सोहळ्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंददायी सरप्राइज दिले होते. आता या नवविवाहित जोडप्यावर चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ईशा आणि अभिषेक यांच्या नव्या आयुष्याच्या या सुंदर प्रवासासाठी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात असून त्यांच्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि यश भरभरून लाभो अशीच सर्वांची इच्छा आहे.

