पालिकेची मतमोजणी प्रक्रिया मार्कंडी येथील युनायटेड हायस्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात रविवारी (ता. २१) सकाळी १० वा. होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सात प्रभागांत चार फेरीत, तर सहा प्रभागांमध्ये तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. दीड ते दोन तासांत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली. १४ प्रभागांकरिता २८ नगरसेवकांची नियुक्ती या निवडणुकीतून केली जाणार आहे. नगराध्यक्षपद हे जनतेतून निवडले जाणार आहे. इव्हीएम मशीन युनायटेड इंग्लिश स्कूल येथील स्टॉकरूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. याची मतमोजणी रविवारी होणार आहे. मतमोजणीसाठी १४ टेबल लावले जाणार आहेत. प्रभाग क्रमांकानुसार प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र टेबल लावले जाईल. त्या त्या प्रभागाच्या टेबलवर नगराध्यक्षपदासाठी झालेल्या मतांची मोजणी केली जाणार आहे. ज्या प्रभागांमध्ये दोन मतदान केंद्र आहेत, अशा प्रभागांमध्ये दोन फेरीत मतमोजणी केली जाईल, असे लिगाडे यांनी सांगितले.
सहा प्रभागांमध्ये तीन मतदान केंद्र आहेत. या प्रभागांची मतमोजणी तीन फेऱ्यांमध्ये होणार, तर सात प्रभागांमध्ये चार मतदान केंद्र असून, या प्रभागांची मतमोजणी चार फेऱ्यांमध्ये केली जाणार आहे. प्रत्येक फेरीला २० मिनिटांचा कालावधी लागेल. ज्या ठिकाणी दोन फेऱ्या होतील त्या ठिकाणी ४० मिनिटांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल. ज्या ठिकाणी ३ मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी ६० ते ७० मिनिटांत तर ज्या ठिकाणी ४ मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणची मतमोजणी ८० ते ९० मिनिटांत पूर्ण होईल. उमेदवार आणि त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना प्रवेश दिला जाणार आहे.
१०० कर्मचाऱ्यांची निवड – या प्रक्रियेसाठी प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी नेमण्यात आले आहेत. यात मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक तसेच शिपाई आणि कोतवाल यांचा समावेश आहे. सात टेबलांसाठी अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. याबरोबरच मॅन्युअल टीम, एक्सेल टीम, ऑनलाईन टीम नेमण्यात आली आहे. एकूण १०० कर्मचाऱ्यांची निवड या प्रक्रियेसाठी करण्यात आली आहे. दीड ते दोन तासांत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती लिगाडे यांनी दिली.
